गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2022, 8:41 AM
   

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसैनिकांमध्ये एकच रोष पाहिल्याचे मिळाले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर  यांनी संताप व्यक्त केला आहे. 

गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया नितिन नांदगावकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईत तीव्र रोष व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गद्दारांना माफी नाही. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पाय ठेवून दाखवावा. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया संतप्त शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना जमण्याचे आदेश

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीच्या बातमीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. शिवसेनेच्या एकेका आमदारांना संपर्क साधून वर्षा बंगल्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची मोठी बैठक पार पडली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिवसेना भवनाकडे जमा होण्याचे आदेश दिले. यावेळी नितीन नांदगावकर हेदेखील सेना भवनावर दाखल झाले. यावेळी या बंडखोरीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली असता, आपल्या रोखठोक शैलीत त्यांनी गद्दारांना सज्जड दम दिला आहे.

प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल

बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले की, विधानसभेत वेळ येईल तेव्हा आकडे मोजा, आता घाई कशाला? सभागृहात पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे आमदार आज नाहीत त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर कारवाई होईल. त्यांची आमदारकी रद्द होईल. त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राजकीय अस्तित्व पणाला लागेल असे त्यांनी सांगितले. 

    Post Views:  164


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व