अकोला : देशात कोरडी पाने, सिगारेट, विडी, चिलम, गुटखा अशा विविध रुपात तंबाखू सेवन केले जाते. देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात. मात्र तंबाखूमुळे साधारणपणे १० लाख लोक मरण पावतात, अशी माहिती मंगळवारी ३१ मे रोजी असणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त डॉ. योगेश साहू यांनी दिली आहे.
डॉ. साहू सांगतात की, तंबाखू सेवनामुळे अनेक रोग जडतात, त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसतात. यात अथरोस्कोलोरोसिस, हार्ट अटॅक, पेरिफेरल वॅस्कुलर डिसिज, ब्रेन स्ट्रोक, अॅम्पायसिमा लंग्ज कॅन्सर, फिटल डॅमेज, लॅरिंजियल कॅन्सर, डेंटल प्रॉब्लम, ल्यूकोप्लाकिया, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, ओरल कॅन्सर आदींचा समावेश आहे. प्रतिदिवशी २० सिगारेट ओढणारा व्यक्ती आपले आयुष्य १० वर्षांनी कमी करून घेतो, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीमध्ये तोंड उघडणे लवकर बंद होणे, वारंवार तोंड येणे, तोंडात लाल व पांढरे चट्टे दिसणे, जेवताना तिखट लागणे, तोंड कमी उघडणे, तोंडातील जखम एक महिन्यापेक्षा जास्त न बसणे, तोंडात अनावश्यक गाठ आढळणे, जिभेला असणारी एखादी गाठ होणे, आवाजात झालेला बदल, लाळग्रंथीच्या जागेवर असलेली सूज येणे, आदी लक्षणे हळूहळू दिसून येतात. यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे अत्यावश्यक ठरते. असेही ते सांगतात. डॉ. साहू तंबाखूमुक्त भारत ही संकल्पना प्रतिबंधात्मक केंद्राच्या माध्यमातून राबवित असून, तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू त्यागाचा संकल्प करावा, असे आवाहनही डॉ. साहू यांनी केले आहे.
विषारी द्रव्याचे शरीरावर हाेऊ शकतात परिणाम
Post Views: 189