राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी देऊ; उमेदवारानं दिली आमदारांना मोठी ऑफर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 May 2022, 10:29 AM
   

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं तिसरा उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. सुरुवातीला संभाजीराजे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याची घोषणा केली होती. परंतु कुठल्याही पक्षाने संभाजीराजेंना थेट पाठिंबा न दिल्यानं अखेर या निवडणुकीतून माघार घेतली. 

राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ४ उमेदवार दिले आहेत. मविआकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. तर भाजपानेही या निवडणुकीत ३ उमेदवार देऊन चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ उमेदवार निवडून येण्याइतपत मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यात अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. 

आता या निवडणुकीत आणखी एक अपक्ष उमेदवार उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने जो कुणी आमदार त्यांना सहकार्य करेल त्यांना सफारी गाडी भेट देऊ असं आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे. अरुण निटुरे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी आम्हाला सहकार्य करावं. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदाराने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केले आहे. 

तसेच सहकार्य करून मला संसदेत पाठवावं. त्या आमदारांचे उपकार विसरणार नाही. जे आमदार मदत करतील त्यांना पक्षाच्या वतीने सफारी गाडी भेट देऊ. यासाठी ४५ वाहनांचे कोटेशन आणलं आहे. त्याची किंमत जवळपास ११ कोटीपर्यंत जाते. कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे सहकार्य करू ही लालच नाही. गरीब शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवावं ही हात जोडून विनंती असल्याचं अरूण निटुरे यांनी सांगितले.  

सहाव्या जागेसाठी चुरस 
राज्यसभा निवडणुकीत १३ अपक्ष आमदार व लहान पक्षांचे आमदार कोणाला कौल देतात यावर सहाव्या जागेचे भवितव्य अवलंबून असेल. आपल्या हक्काच्या मतांशिवाय अतिरिक्त मतांची तजवीज आम्ही केलेली आहे, असा दावा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकेक उमेदवार  हे पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील.  निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्याला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडे बाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत आणि लहान पक्षांबाबत. सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या  प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही.

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व