अकोला येथे १० वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे; उद्घाटक श्री. नागराज मंजुळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Dec 2022, 8:45 AM
अकोला : माय मराठीच्या साहित्याचे दालन समृध्द करणाऱ्या मराठी गझलचे १० वे अखिल भारतीय संमेलन शनिवार व रविवार दि. ०७ व ०८ जानेवारी, २०२३ रोजी पोलीस लॉन्स, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उद्घाटन शनिवार दि. ०७ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द कवी आणि सिने दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे यांचे हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष म्हणून मा.ना. श्री. दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत मा. श्री. सुरेश द्वादशीवार उपस्थित राहणार आहेत.
या शिवाय गझल संमेलनांचे माजी अध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना देखील यावेळी अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, मुशायरे, गझल गायन मैफिली, गझलवर मुक्तचर्चा, गझल संगम : बहुभाषी गझल मुशायरा, इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मान्यवरांच्या हस्ते गझलकार विद्यानंद हाडके यांच्या गज़लसरा तसेच गझलकार किरणकुमार मडावी यांच्या जिंदगी भाकरीच्या दबावात आहे या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दिनांक ०७ जानेवारी, २०२३ रोजी दुपारी २ वाजता समकालीन गझलेत सामाजिक बदलांचे प्रतिबिंब उमटते का? या विषयावर परिसंवाद ठेवला आहे. ज्येष्ठ गझलकार व लेखक श्री. प्रसाद कुळकणी - इचलकरंजी हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील तर वक्ते म्हणून प्रा. सुनंदा पाटील मुंबई, डॉ. अशोक पळवेकर, अमरावती, श्री. सुदाम सोनुले, अमरावती हे सहभागी होतील.
सूत्रसंचालन श्री. जगदीश भगत, समन्वयक, एफ.एम.रेडिओ, वर्धा हे करतील. गझल बहार: मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन दुपारी ४.३० वाजता करण्यात आले असून नवोदित तसेच जुने-जाणते गझलकार या मुशायऱ्यात आपल्या गझल सादर करणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या अखेरचे सत्र हे गझल गुंजन या गझल गायन मैफिलीचे असेल. या मैफिलीत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले गझल गायक कलावंत आपल्या गझल सादर करतील.
रविवार दि. 08 जानेवारी, 2023 या गझल संमेलनाच्या दुसर्या दिवशीचे पहिले सत्र सकाळी 10 वाजता मुक्तागंण या मराठी गझलवरील मुक्त चर्चेने सुरु होईल. यामध्ये गझलशी संबंधित विविध विषयांचर खुली चर्चा होईल आणि यात गझल क्षेत्रातील अभ्यासकांसोबतच रसिकांचाही सहभाग असेल.
सकाळी 11 वाजता गझल संगम हा बहुभाषी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून या भाषाभगिनी सोहळ्यात उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती, कोंकणी, इंग्रजी, या भाषा तर वर्हाडी, अहिराणी, गोंडी, आगरी इत्यादी बोलींमधील गझला सादर करण्यात येतील. संमेलनातील दुसरी गझल गायन मैफिल दुपारी 1.30 वाजता ठेवली असून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन आलेले गझल गायक कलावंत या मैफिलीत आपल्या गझल सादर करतील.
गझल बहार हा दुसरा मराठी गझल मुशायरा दुपारी 2.30 वाजता आयोजित केला आहे आणि या मुशायर्यात नवोदित तसेच जुने-जाणते गझलकार आपल्या गझल सादर करतील. 10 व्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचा समारोप सोहळा सांयकाळी 5 वाजता संपन्न होईल. हिंदी भाषेतील सुप्रसिध्द व्यंग कवी मा. घनश्याम अग्रवाल या समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील शिवाय अनेक मान्यवर या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित असतील. गज़ल नवाज़ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाने संमेलनाची सांगता होईल.
संमेलनाला गझलच्या रसिक चाहत्यांनी, वाचकांनी, गझलकारांनी व गझल अभ्यासकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन संमेलनाच्या आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. प्रतिनिधी म्हणून येऊ इच्छिणार्यांनी प्रथम नोंदणी करावी हि विनंती. गझल संमेलनातील सहभाग आणि इतर बाबींविषयी माहिती हवी असल्यास किशोर बळी (9421677181 / 9075344312), भीमराव पांचाळे (9969579911/8879430997), डॉ.गजानन नारे (9422161878), प्रा.संजय खडसे (7588803334) यांच्याशी संपर्क साधावा.
Post Views: 125