धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असताना शहरवासियांना पाणीटंचाईची झळ का सोसावी लागत आहे...


माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांचा प्रशासनाला आक्रमक सवाल
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2022, 9:10 PM
   

अकोला - गतवर्षी जिल्ह्यात पाऊस मुबलक प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणांमध्येही सद्यस्थितीत मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा केल्या जात नाही आहे.  रेकॉर्ड ब्रेक उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना पाण्याची कमतरता का भासवली जात आहे व अशाप्रकारे पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण करून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे असा गंभीर सवाल माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांनी केला आहे.
सध्या शहराच्या विविध भागांमध्ये तीन दिवस चार दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. जेव्हा की धरणातील मुबलक जलसाठा स्थिती पाहता शहराला दररोज पाणीपुरवठा होणे क्रमप्राप्त आहे. मात्र प्रशासनाचे मनमानी धोरण एवढ्या तापत्या उन्हात अकोला वासियांच्या जीवावर उठले आहे. भरउन्हात पाण्याची वाढती मागणी पाहता दररोज पाणीपुरवठा होणे अत्यावश्‍यक असताना प्रशासनाने पोरखेळ चालविला आहे. शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा या हेतूने अमृत योजनेकरिता शासनाने 100 कोटी रुपये प्रशासनाला दिले आहेत. एवढे असतानाही नेमके कोठे पाणी मुरत आहे हे शहरवासीयांना न उलगडणारे कोडे झाले आहे. गोरक्षण भागात दर चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे हा रखरखत्या उन्हात शहरवासीयांचा अंत पाहण्यासारखे झाले आहे तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांनी केली आहे.

    Post Views:  318


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व