बोईसर संजय नगर येथील पुलाचे काम मंद गतीने


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2022, 12:36 PM
   

बोईसर -(संतोष घरत)- पालघर तालुक्यातील बोईसर या ठिकाणी नवापुर मार्गावर संजय नगर येथे असणाऱ्या ओहोळावर पूल बांधण्याचे काम मंदगतीने सुरू असल्याचा येथील जनतेचा आरोप असून ह्या ओहोळात सांडपाणी  वाहत असल्याने कामांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत .या मार्गावरील वाहतूक मे महिन्याअखेर पूर्ववत होण्याकरिता एम. आय. डि.सी. प्रयत्नशील असल्याचे कळते.
बोईसर येथील नवापूर मार्गावरील संजय नगर येथे असणाऱ्या  ओहोळावर पावसाळ्यात पाणी वाहत असून तेथील वाहतूक विस्कळीत होते. त्याकरिता याठिकाणी छोटा पूल बांधण्यासाठी एमआयडीसीकडून काढलेल्या निविदा (टेंडर) ला  ठेकेदाराकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ,दुसऱ्या वेळेस काढलेल्या निविदा (टेंडर) ला प्रतिसाद मिळाल्याने हे काम दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले .त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहने दुसऱ्या रस्त्याचा सहारा घेऊन रेल्वेस्थानकावर पोहोचत असतात.     
               या पुलाचे काम सुरू झाले असून  ओहोळातून वाहणारे सांडपाणी थांबविण्याकरिता ठेकेदाराने त्याठिकाणी पंप बसविले  असून पुलाच्या बांधकामासाठी उत्खनलेला भाग कोरडा झाल्यानंतर त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थिती पुलाच्या पायाच्या खालच्या भागात प्लंम काँक्रिट करण्यात आले असून येत्या काही दिवसात पाया भरणी चे काम हाती घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल ह्यासाठी एमायडिसी सज्ज असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.                     या पुलाच्या उभारणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे व काम मंदगतीने सुरू असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत असल्याचे समजते. तसेच नागरिकांना हा रस्ता बंद असल्याने गोल गोल फिरून स्थानकापर्यंत पोहोचावे लागले याचा जनतेच्या मनात आक्रोश असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे.

    Post Views:  271


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व