उन्मादी प्रवृत्ती आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अकोल्याच्या जनजीवनाला धक्का.....!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-05-18
ज्यांना स्वतःच्या जीवनातला स्व कधी कळला नाही, जीवन म्हणजे काय आणि ते कसे जगावे हेच कधी समजले नाही, त्यांना बंधुत्व,मानवता ह्या गोष्टी काय कळणार ? परंतू तेच आमचा धर्माच्या चर्चा करून सामाजिक शांततेला फार मोठे धोके निर्माण करीत आहेत.खरा धर्म काय,देव काय आहे हे विव्दत्ता आणि ज्ञानाचे अर्धवट प्रदर्शन करण्याचे दांभिक चाळे करणारांनी समजून घेतले पाहिजेत. त्या अगोदर आपण माणसं आहोत हे समजून घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तरच खरा धर्म आणि देव काय ते समजू शकेल.त्यातूनच पुढे आलेला सर्वश्रेष्ठ मानवताधर्म या चिरंतन सत्त्याचे दर्शन होईल.परंतू काही लोकांनी जन्मानंतरचा वसा हाच मुळात स्वतःला आणि ईतरांना उध्दरण्यासाठी नव्हे तर तर आपल्या अघोरी हा विकासाच्या विधायक विचाराऐवजी अज्ञानाने विघातक विचारातच मानलेला असते.त्यामुळे या अतिरेकी विचारांचे घटक म्हणजे उपद्रवमुल्ल्ये जोपासणाऱ्या विघातक अपप्रवृत्तीच असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजानेच वेळ देऊन हालचाली टिपत राहून नेहमीच्या दक्षतेतून सामाजिक सद्भावाला धक्का पोहचविणारांवर क्षणोक्षणी पाळत ठेवली पाहिजे.अशा प्रवृत्ती ह्या देशातील राजकारण्यांनी आणि प्रशासनातील अनैतिक प्रवृत्तीने अगोदरपासूनच जोपासलेल्या असतात.मग त्या कालांतराने अमर्याद अस्तित्व निर्माण करून वाढत राहतात. अशे प्रकार व त्यांचे सोशल मिडीयांमधून प्रचार केल्याने समाजाला काय उपद्रव होऊ शकतो याचे चटके देणारे अनुभव शनिवारच्या दंगलीतून अकोलेकरांना परत एकदा आलेले आहेत.
कडक तापणाऱ्या अकोल्यामध्ये दिवसभर जीवाची लाही लाही होऊन दमलेले जीव रात्री सुखाची झोप घेत असतांनाच दंगलखोरांनी या निरपराध नागरीकांच्या घरांवर आणि गाड्यांवर हल्ले करून आगीचे वणवे पेटविण्याचे प्रयत्न केले .या प्रकारामुळे अकोल्यातील समाजमने ढवळून निघाली....रात्रीच्या वेळी झोपेत असतांनाच कधी काय होऊ शकते याचे थरारक अनुभव घेऊन अस्वस्थ..... अशांत झाली आहेत. सोशल मिडियामधून पोस्ट व्हायरल करणाऱ्याच्या उपद्व्यापाची शिक्षा सर्वसामान्न्य नागरीकांना निरपराध श्रमिकांना भोगायला लावणाऱ्या उलट्या काळजाच्या लोकांनि जुणे शहरातील हरीहर पेठ, भांडपूरा, हमजा प्लॉट,शिवसेना वसाहतीच्या टोकावर व राजेश्वर मंदिर रोड,आणि ईतरत्र चाल करून धार्मिक स्थळांवरही हल्ले केले. तरीही त्यांचे समाधान न झाल्यानेअनेकांच्या दुचाक्या आणि चार चाकी गाड्या जाळून टाकण्याचे नामर्द कारनामेही त्यांनी केले. त्यांचा हैदोस सतत चालू राहिला.सिरस्त्याप्रमाणे पोलिस हे जरा उशिराच पोहचले. हे कटू सत्य समाजाला नेहमी झेलावे लागते. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणारा उपदव्यापी हे काम करून मोकळा झाला.त्याला अटक झाल्यावरही पुढे काय होणार याची अनेक घटनांमधून पुढे आलेली उत्तरे म्हणजे समाजावर सतत होत असलेला अन्याय आहे.
सोशल मिडियातून रिकामे उद्योग करणारे अनेक असेच उन्मादी हे राजकीय दुकानदाऱ्या चालविणारे स्वार्थांध लोक असतात.म्हणूनच म्हटल्या जाते .त्यांना आपल्या महत्वाकांक्षेपलिकडे समाजजीवनाशी काही देणे घेणे नसते. अकोल्यात सोशल मिडिया तील पोस्टमुळे प्रक्षुब्ध झालेल्या युवकांचा गट हा आकोट फाईल पोलिस स्टेशनमध्ये अगोदर गेला.त्यांनी संबंधित युवकावर गुन्हा नोंदवा म्हणून मागणी केल्याची माहिती जनमानसातून मिळालेली आहे.परंतू तिथे त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ते संतापून पोस्ट टाकणाराचा शोध घेत सिटी कोतवाली आणि जुणे शहर पोलिस स्टेशनची कार्यक्षेत्रे ओलांडत जुण्या शहरातील वस्त्रांचे सरकत गेली.त्यांच्या हातात ज्वलंत द्रवपदार्थ, थैल्यांमध्ये दगड,फटाके आणि धारदार शस्त्रे होती. या गुन्हेगार तरुणांचे हे जत्थे अकोल्यातील तीन पोलिस स्टेशनची हद्द ओलांडून जुण्या शहरापर्यंत पोहचले कसे याचा विचार प्रथम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक नेत्यांनी केला पाहिजे.यावेळी पोलिस होते तर कुठे होते ? ते रात्रीच्या वेळी ते बेसावध कसे होते ? याची उत्तरे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी जनतेसमोर ठेवली पाहिजेत.
तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जाणारा हा आक्रमक युवकांचा गट कोणाच्याही नजरेत येऊ नये,काही तरी गडबड होते आहे म्हणून सावध होऊन त्यांना मधेच अटकाव करण्याची उपरती पोलिस खात्याला होऊ नये,हालचाली पाहून पोलिसांची कर्तव्यदक्षता जागृत होऊ नये याचे अकोलेकर जनतेला फार मोठे आश्चर्य वाटते आहे.त्यामुळे समाजाचे रखवालदार, संरक्षक म्हणून ज्या पोलिस दलाकडे पाहिले जाते, त्यांचीच संकटकाळी दिसलेली बेसावधानता आणि चालढकल शनिवारी अकोलेकरांच्या जीवावर बेतली.यात मालमत्तेचे नुकसान,हा थरार पाहणाऱ्यांना बसलेले मानसिक धक्के आणि एका युवकाचा प्राण जाणे ह्या साऱ्या घटना ह्या अविस्मरणीय राहणार आहेत. दंगली होतात.मालमत्तांचे नुकसान होते ते भरून निघेल. परंतू मानसिक स्वास्थ जागेवर यायला वेळ लागतो. मात्र जाणारे जीव आणि पाशवी प्रवृत्तीने घडविलेल्या राक्षसी थैमानाचे व्रण समाजमनाच्या मनाच्या पटलावरून लवकर निघून शकत नाहीत.अशा प्रकारांनी लहान मुले, महिला,वृध्द यांचे मानसिक स्वास्थ्य संकटात येऊन ते कायमचे भयग्रस्त आणि मानसिक दबावाने चिंताग्रस्त राहतात.
समाजातील आनंद हिरावून त्यांना अस्थिर जीवनाचे हे धक्के वारंवार बसू नयेत यासाठी लोकप्रतिनिधी,सामाजिक नेते यांनी कायम दक्ष राहून अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून चिंतन केले पाहिजे. यातून निदर्शनास आलेल्या उणीवांच्या सामाजिक जाणीवा प्रशासनाला दिल्या पाहिजेत.झालेली दंगल ही उन्मादी प्रवृत्तीचे थरार नाट्य जरी असले तरी पोलिसखात्याला ते वेळीच नियंत्रित करता आले नाही हे सत्त्य नाकारता येण्यासारखे नाही.यातून पोलिसखात्यातील उणिवा समाजसमोर आलेल्या आहेत हे मात्र निश्चित.नाही तर दंगल झाली सर्व संपले.आता परत काही घडू शकणार नाही या आविर्भावात पोलिस खाते आणि प्रशासनासह सर्वच कु़ंभकर्णी झोपेत राहिले तर अशा आघातांमधून कधी काळी होणारे सामाजिक नुकसान आणि जिवितहानी टाळता येणार नाही.म्हणून झालेल्या घटनांपासून धडे घेऊन आत्मचिंतन झाले पाहिजे.कर्तव्याच्या वाटचालींच्या दिशा निश्चित होऊन प्रतिबंधकतेच्या दृष्टीने घडविलेल्या बदलातून समाजामध्ये शासन, प्रशासन आणि सामाजिक नेत्यांप्रती विश्वास वृध्दींगत झाला पाहिजे.तरच समाजमध्ये शांतता कायम राहून निरोगी व्यवस्था विराजमान झाल्याचा विश्वास नागरीकांमध्ये वाढू शकेल....!
संजय एम.देशमुख, संपादक
मोबा.क्र ९८८१३०४५४६
Post Views: 706