जनतेचा विकास आणि आनंदासाठी अमानविय वाटचालीला प्रतिबंध हवा ! : संजय एम.देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  31 Mar 2022, 5:10 PM
   

संस्कार हे घराचे वैभव, विनम्रता सौजन्य, विधायकता हे कोणत्याही परिवाराच्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे. अशी चांगली विधाने वाचून क्षणभर तरी आनंद हा माणसाच्या मानण्यावर अवलंबून आहे, या सकारात्मक रहस्यावर विश्वास ठेऊन आम्ही उमद्या आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जात असतो. समाजातील परिवारांचा आनंद हा जसा त्या कुटूंबप्रमुखावर आणि घरातील कर्त्या सवरत्या लोकांवर अवलंबून असतो, त्याप्रमाणे कोणत्याही देशातील प्रजेचे प्रगत जीवनमान, मानसिक, भौतिक विकास हा त्या त्या देशातील सत्ताधारी शासनाच्या म्हणजे, कर्तव्य आणि बांधिलकीनिष्ट रयतेच्या राजावर, त्यांच्या संवेदनशील सक्रिय वाटचालीवर अवलंबून असतो. ती वाटचाल दिशाहिन असतांना धर्म, संस्कृती आदर्शाच्या खोट्या गर्जना ऐकण्यासाठी स्वतःच्या परिवाराच्या जीवनमानाशी तडजोड करून उसण्या अवसानाने चुकीच्या वाटचालीला उपाशीपोटी समर्थन देत राहणे शहाणपणा ठरू शकत नाही. उन्मादी सत्तापिपासू, अनैतिक सत्ताधार्‍यांच्या कृतीहीन आरोळ्यांमध्ये आपलाही आवाज मिळवत राहणे म्हणजे, त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या सद्विवेकबुध्दी गहाण ठेऊन पूर्वेकडून उगवलेल्या सूर्याला पश्चिमेकडून उगवला असे सांगण्यासारखे आहे.
आपल्या जगण्याला जशी धर्मशास्त्रातील मानवी जीवनमुल्यांचा तात्विक आधार आणि कर्मयोगी साधक महापुरूषांच्या आदर्शांचे पाठबळ आहे. त्याचप्रमाणे देश आणि देशातील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना त्यांच्या भौतिक विकासासाठी त्यांचे हक्क मिळावेत यासाठी लोकशाही शासनव्यवस्थेची प्रतिष्ठापणा भारतात झालेली आहे. संविधानानुसार राज्य कारभार चालावा लोकशाहीतील तत्वांचा आणि जीवनशास्त्रातील मार्गदर्शक जीवनमुल्यांचा अंगीकार करून त्यानुसार राज्यकर्त्यांनी वाटचाल करावी. तसे आदर्श प्रजेमध्ये निर्माण करावेत, यामुळे संविधानिक कायद्यांच्या राज्यात प्रत्येक घटक सर्वांगीण विकासातून आपले जीवन आनंदी करू शकेल.
नुकतेच एक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण झाले. त्यामध्ये दुर्देवाने भारताचा नंबर वर्गातील वरपास नव्हे, संपूर्ण नापासच्या पातळीवर आहे. अंदाजे १६४ देशाच्या सर्वेक्षणामध्ये कोणत्या देशातील जनता अधिक आनंदी आहे याचा अंदाज घेण्यात आला. परंतू नेदरलॅन्डसारखे छोटे देश चवथ्या पाचव्या क्रमांकावर आहेत. तर आपला देश त्या यादीमध्ये अमृतजलाच्या एकदम तळाशी म्हणजे १५४ व्या क्रमांकाच्या आसपास आहे. म्हणजे जीवनात निराशा आणि अस्थिरतेमुळे मानसिक स्फोटाच्या कोणत्या पातळीवर आपण सध्या आहोत, आणि यामध्ये उन्मत्त आणि हिंस्त्र वाटचालीने डबघाईस आलेल्या पाकिस्तानसारख्या देशापासूनही आपण किती कमी अंतरावर आहोत याचा विचार आता देशावासियांनीच केला पाहिजे.
देशाचा सर्व बाजूंनी योग्य विकास साधून जनतेच्या जीवनात आनंद आणि विधायक विचारांचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्यकर्त्यांची वाटचाल योग्य असली पाहिजे. संविधानिक तत्वांनी चालणार्‍या शासन प्रशासनिक कारभारामध्ये नियंत्रणासाठी विरोधी पक्ष आणि जनतेचा सहभाग असला पाहिजे. सागरात पैलतिरावर घेऊन जाणार्‍या नौकेचा नावाडी योग्य रितीने नौका वल्हवतो आहे की नाही यावर दक्ष प्रवाशांचा पहारा असला पाहिजे. तरच सर्वांचे जीवन सुरक्षित राहून ध्येयसिद्धीच्या पैलतिराकडे सर्व प्रवाशी जाऊ शकतील. परंतू देशातील सध्याची परिस्थिती पाहता लोकशाही, संविधान, धर्मशास्त्रातील मानवी जीवनमुल्यांशी प्रतारणा करून, प्रसंगी स्वतःच्या मतलबी, सत्ताविपासू वृत्तीच्या प्रबळतेने अघोरी महत्वाकांक्षाच्या पुर्ततेसाठी सुरू असलेला विनाशकारी चित्रपट येथील पटलावर सध्या सुरू आहे.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून न्यायव्यवस्था आणि स्वायत्त संस्थांनाही गुलाम बनवित त्यांचा वापर अघोरी महत्वाकांक्षेच्या सुडाच्या राजकारणासाठी करणे सुरू आहे. त्यामुळे कुणावर ईडीचे ब्रम्हास्त्र, कुणावर खोटे नाटे कारवाईच्या अस्त्रांची फेकाफेकी सुरू आहे. जनतेच्या जीवनमानाच्या प्रश्नांना बगल देऊन दररोज रात्रंदिवस नुसते आरोप आणि प्रत्यारोपांच्या आखाड्यात कसरती करण्याचे खोटे पराक्रम तेवढे सुरू आहेत. याशिवाय देवा आणि राज्याराज्यातील राजकारणाच्या मैदानात विकासाचा ध्यास घेतलेले ध्येयवेडे पहेलवान कुठे आढळतच नाहीत. हे जगाला उच्चत्तम संस्कृतीचा आदर्श देणार्‍या भारताचे फार मोठे दुर्देव आहे. या एकंदर परिस्थितीवर अंकुश ठेऊन देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा, त्यासाठी घटनेने त्यामध्ये जनतेचा सहभाग आणि विरोधी पक्षाची योजना केलेली आहे. परंतु देशात नामशेष होत चाललेले विरोधक आणि त्यांच्या मुळांवर घाव घालून त्यांना संपूर्णपणे संपविण्याचे भाजपचे अघोरी षडयंत्र हे देशावर घोंगावणारे एक संकट आहे. याची चिंता सध्या शरद पवार आणि भाजपच्याच नितीन गडकरींसारख्या  संवेदनशील सामाजिक नेत्यांनाही लागलेली आहे. विदर्भातून देशाच्या राजकीय पटलावर यशस्वी कामगिरी करणार्‍या गडकरींनीही दै. लोकमतच्या कार्यक्रमात हे सत्त्य मान्य केले. त्यामुळे वास्तव सत्त्य स्विकारून पक्षिय भेदभावांपालिकडे स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर अंगीकार करून देशाच्या कल्याणाचे विचार मांडणारे परिपक्व विधायक विचारांचे नेते म्हणून नितीन गडकरींकडे पाहिले जाते. सुडाचे राजकारण नको, हे त्यांचेही म्हणणे आहे. काँग्रेसने आत्मविश्वास कायम ठेऊन कामाला लागावे हा उदार अंतःकरणाने काँग्रेसला दिलेला मोलाचा सल्लाही आहे.  शेजार्‍याचे घर जळून बेचिराख झाले तरी चालेल परंतू माझी उंच बिल्डींग अभिमानाने डोलत राहिली पाहिजे. या विकृत मनोवृत्तीतून सुरू असलेल्या नृशंस थैमानाला स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी जनता आणि देशातील शरद पवार, ममता बॅनर्जींसारख्या नेत्यांनीही आता प्रतिबंध करण्यासाठी एकत्रितपणे पुढे येण्याची तयारी आता चालविलेली आहे. इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी घटनात्मक होती. परंतु सध्या सुरू असलेली मनमानी, दंडेली ही लोकशाहीच्या पडद्यामागून सुरू असलेली हिटलरशाही आहे.  प्रत्येक काम करणार्‍या माणसाच्या किंवा सत्ताधार्‍यांच्या चुका ह्या होतात. परंतु देशातील लोकांवर अन्याय करून मरणारांना साधी श्रद्धांजलीही न देणार्‍या अमानविय सत्ताधार्‍यांची ही वाटचाल म्हणजे अमानुष निष्ठूरतेचा उभा झालेला हिमालय आहे.  यासाठी देशातील विरोधी पक्षिय संवेदनशील नेते आणि मतदारांनी नियोजनबद्ध वाटचाल करणे आता काळाची गरज आहे.
संजय एम.देशमुख 
मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  247


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व