सौ . सारिका अयाचित यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  24 Mar 2022, 1:04 PM
   

कविता ही कवीच्या मनाचं सुंदर लेणं असते. कविता ही फक्त शब्दांचा प्रपंच नव्हे तर तिच्या माध्यमातून समाजमन जागृत होत असतं. या कवयित्री च्या कवितांना प्रतिभेचा सुगंध आहे असे मौलिक उद्गार नागपूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. रमा गोळवलकर यांनी शब्दगंध प्रकाशन मार्फत प्रकाशित झालेला सौ. सारिका सारंग अयाचित यांच्या वाटे कधी कधी.... या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढलेत.
       हॉटेल रायझिंग सन येथे संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात मा. डॉ. रमा गोळवलकर यांचे शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार मा. महेंद्र कवीश्वर हे अध्यक्षस्थानी होते. विविध प्रतिमातून आयुष्याचे रंग टिपणारी आणि मानवी जगण्याचा भावार्थ सांगणारी सौ. अयाचित यांची कविता एका निर्मळ मनाची अभिव्यक्ती आहे , असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले , या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभात किड्स चे संचालक मा. डॉ. गजानन नारे आणि ज्येष्ठ साहित्यिक मा. सुरेश पाचकवडे लाभले होते. अंतर्यामीची चिंतनशीलता, संस्कारप्रणित प्रतिमा असलेली सौ. अयाचित यांची कविता जीवन जगण्याचं भाष्य करणारी आहे असे डॉ. गजानन नारे यांनी आपले मत मनोगतातून व्यक्त केले. सौ. अयाचित यांच्या कविता ह्या त्यांच्या जीवनातील अनुभव आणि अनुभूतीतून आलेल्या शब्दांचा आविष्कार आहे, असे मा. सुरेश पाचकवडे यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले. 
      या सुंदर प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र टाईम्स चे प्रतिनिधी पत्रकार श्री नीरज आवंडेकर , शब्दगंध प्रकाशनचे प्रकाशक डॉ. विनय दांदळे , सारंग अयाचित,  गोविंद बुगदाणी, रवींद्र दिवेकर, गिरीष पिंपरकर, वैभव दिवेकर, सौ. गायत्री बुगदाणी, डॉ. अभय कुळकर्णी, कांचन पटोकार , सौ. वृषाली वाघमारे , सौ. अर्चना बेलसरे, सौ. शिल्पा आवंडेकर , शुभम अयाचित, तन्वी अयाचित यांचेसह बरीच रसिक मंडळी उपस्थित होती. या प्रकाशन सोहळ्याचे उत्कृष्ट संचालन सौ. रेवती अयाचित-पांडे यांनी केले तर सौ. मुक्ता ठकार यांनी आभारप्रदर्शन केले.

    Post Views:  375


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व