साहित्यिक संतोष इंगळे यांचे दुःखद निधन
युवा साहित्य चळवळीचा झंजावात थांबला
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Aug 2022, 7:48 PM
अकोला : सृष्टी युवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष किसनराव इंगळे यांचे ब्रेनस्ट्रोक मुळे दुःखद निधन झाले. पॅरालीसीसचा अटॅक आल्यामुळे ते अकोल्यातील एका खाजगी इस्पितळात उपचार घेत होते. बुधवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचे प्राणज्योत मालवली. संतोष इंगळे यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या संपादनामध्ये त्यांनी झळ हा प्रातिनिधिक कविता संग्रह काढला होता. विदर्भात त्यांनी युवा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. सृष्टी युवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पाच राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. अकोला, दर्यापूर, खामगाव, वाशिम आणि अकोला या ठिकाणी झालेल्या युवा साहित्य संमेलनांची ख्याती राज्यभर गेली होती. याव्यतिरिक्त त्यांनी पहिल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, पहिले ज्येष्ठ साहित्यिक साहित्य संमेलन आणि वऱ्हाडी साहित्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले होते. ते शब्दसृष्टी या दिवाळी अंकाचे प्रकाशक होते. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शब्दसृष्टी साहित्य आणि साहित्य कृती पुरस्काराचे वितरण दरवर्षी करण्यात येत होते. आजवर १०० पेक्षा अधिक साहित्यिकांचा त्यांनी गौरव केला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हजारो साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध झाले होते. त्यांचा पाणीपुरीचा व्यवसाय होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम असूनही त्यांनी दर्जेदार आणि दिमागदार साहित्य सोहळ्याचे आयोजन केले होते. साहित्य क्षेत्रात त्यांनी बहुमोल योगदान दिले. त्यांच्या दुःखद निधनामुळे युवा साहित्य चळवळीचा झंजावात थांबला असून साहित्य वर्तुळामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची खंत राज्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.
Post Views: 366