महिलांनी आता जागृत होऊन संधीचे सोने केले पाहिजे! : संजय एम. देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-08
   

समाजात ज्या-ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते, म्हणजे त्यांचा आदर केला जातो, सन्मान होतो त्याचठिकाणी देवी-देवता रममाण होतात हा उदात्त विचार मानणारी आपली भारतीय संस्कृती आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित झाला आणि त्याची सुरूवात अमेरिकेमधून जरी झालेली असली तरी आज जगभरात महिलांचा घराघरांमधून सन्मान केला  जातो. ती समाज जननी, स्त्री शक्ती, मातृशक्ती म्हणून तिचा आदर व्हावा हे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने पूर्वीपासूनच आपल्या मनावर बिंबविलेले आहे. परंतू बदललेल्या सामाजिक परिस्थितीत या संस्कृतीचाच अनेकांना विसर पडलेला असल्याने पारिवारीक आणि सामाजिक स्वास्थ्याला आज अनेक ठिकाणी धक्के पोहचत आहेत.
स्त्रियांनी संघटीत होऊन सामूहिक प्रयत्नांनी हक्काकरीता पहिला संघर्ष अमेरिकेत न्यूयॉर्क येथे दि. 8 मार्च 1908 रोजी घडवून आणला होता. तेथे कापडगिरणीत काम करणार्‍या स्त्रिया व मुलांचे कामाचे तास कमी करावेत व मजुरी वाढवावी याकरीता महिलांनी संघटीत होऊन संघर्ष केला. तो पहिला जागतिक संघर्ष ठरला. त्यानंतर 8 मार्च या दिवसाला ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता मिळाली.
आज सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि इतर विविध क्षेत्रात महिला कर्तृत्वाने अग्रेसर आहेत. अनेक क्षेत्रात त्या आपल्या प्रगल्भ विचार आणि परिश्रमपूर्वक कृतीने उच्चस्थानांवर विराजमानही झालेल्या आहेत. हा प्राचीन संस्कृतीचा वारसा जतन करणार्‍या आपल्या देशाकरीता ही एक गौरवास्पद बाब आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून महिलांमध्ये आज आत्मभान येत आहे, त्यांनाही संघटनशक्ती ही प्रगतीकरीता महत्वाची वाटू लागली आणि म्हणून प्रसंगी हक्काकरीता आंदोलनाच्या माध्यमातून त्या एकत्र येत आहेत. चुल आणि मूल ह्या सिमीत जीवनाच्या कक्षा पार करून समाजात बाहेरील विश्वात त्या पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात अग्रेसर ठरत आहेत. आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उत्तुंग भरारी घेऊन राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेत आपल्या महिलाशक्तीच्या योगदानाचे उल्लेखनिय दर्शन घडविले आहे. सर्वत्र क्षेत्रात गगणभरारी घेणार्‍या या महिलांच्या कौशल्याला वाव देऊन त्यांना समाजातील दृष्ट प्रवृत्तीपासून संरक्षण देण्यासाठी पुरूष आणि विशेषतः समाजातील युवावर्गाने आपली सामाजिक साधना सिद्ध केली पाहिजे. त्या सुरक्षितपणे काम करू शकल्या पाहिजेत. जागतिक महिला दिन साजरा करताना हा संकल्प करणे ह्याच महिला दिनाच्या खर्‍या खुर्‍या शुभेच्छा ठरू शकतील!
ब्रिटिशांच्या काळापासून स्त्रियांच्या स्थितीत बरीच सुधारणा होत गेली. वर्षानुवर्षे मर्यादित कुटूंबाच्या परिघात अडकून राहिलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रकाशवाटा दाखविणारे महापुरूष येथे दीपस्तंभ म्हणून उदयास आले. शिक्षणाचे पुरस्कर्ते स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि इतर अनेकांनी ‘अबला’ म्हटल्या जाणार्‍या स्त्रीला ‘सबला’ बनविण्याकरीता आटोकाट प्रयत्न केले. त्याच प्रयत्नांमुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर ठरत आहेत. वर्तमान राजकारणातही महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. परंतु तरीही त्या आजही पूर्णपणे स्वतंत्र नाहीत हे खेदाने म्हणावे लागते. कारण त्यांना उमेदवारी मिळवून देऊन निवडून आणण्याचे काम पती आणि समाजातील पुरूष मंडळी करीत असते म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल करतांना आमच्या राजकारणासाठी सोईचे असेच निर्णय घेऊन काम करावे ही पुरूषप्रधान संस्कृतीची मानसिकता आजही कायम आहे. यासाठीच त्यांना नावापुरतं पुढे करून पती आणि पुरूषमंडळीच आपल्या मतलबाचे राजकारण करीत असतात, त्यामुळे सरसकट हस्तक्षेपाने महिलांमधील कौशल्य, सामाजिक आणि राजकीय क्षमता पूर्णपणे सिद्ध होण्यासाठी त्यांना पुरेशा संधी मिळत नाहीत, आणि समाजातील नारीशक्तीचा पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक, राजकीय, व्यावसायीक आणि अन्य क्षेत्रामध्ये पाहिजे तसा विकास अजूनही होऊ शकलेला नाही. देशातील महिला शक्तीला शुभेच्छा देताना 21 व्या शतकाच्या या उंबरठ्यावर समाजातील महिला खरोखरच स्वतंत्र आहेत का? या प्रश्नावर समाजातील सर्वच घटकांनी या वास्तव सत्त्याचा विचार केला पाहिजे. 
सन 1994 मध्ये ‘महिला धोरण’ पुढे आणून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते; आणि सद्यःस्थितीतही शासनाने अनेक योजना जाहीर करून महिला सबलीकरणाकरीता मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारक पाऊले उचललेली आहेत. आर्थिक सबलीकरणास्तव महिलांकरीता सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातून पुढे येण्याकरीता आरक्षण मिळाल्याने स्त्रियांना मनातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने पुढे येणार्‍या अनेक संधी प्राप्त झालेल्या आहेत, फक्त त्याकरीता सातत्याने अग्रेसर राहून, संघटीत होऊन त्या संधीचे सोने करणे हे सर्वस्वी महिलांवर अवलंबून आहे. आज स्त्रियांकडे अधिकार आहेत आणि संधीही आहेत. त्यांना या दोन्ही गोष्टींचा उपयोग आपल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उत्थानाकरीता करता यावा. याकामी त्यांना उत्तेजन देण्याकरीता, प्रोत्साहीत करण्याकरीता पुरूषांच्याही सहकार्याची आवश्यकता आहे. कारण अनेक वर्षापासून रूजलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रीचे अस्तित्व मोकळ्या मनाने कधी मान्य केलेले नाही. म्हणून आज काळाची गरज ओळखून पुरूषांनीही या बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर पडून याकामी त्यांना उत्तेजन देऊन, प्रोत्साहीत करून त्यांच्या प्रगतीकरीता आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीची विचार धारा जोपासावी. ‘स्त्री’ आणि ‘पुरूष’ हे या समाजातील विकासाच्या रथाची दोन चाके आहेत. म्हणून विकासाच्या या रथाची गती वाढविण्याकरीता स्त्रियांचा आदर, सन्मान होऊन त्यांनाही जीवनात कर्तृत्वातून साधणार्‍या प्रगतीचा आनंद प्राप्त करून देण्यात सहाय्यभूत व्हावे. याकरीता प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. त्याकरीता अशाप्रकारचे मानसिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. महिलांनीही विचारांनी कुटूंब आणि समाजात स्वतःतील क्षमता आणि कौशल्य सिद्ध करून आपल्याला पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तरच त्यांना प्रत्येक संधीचा लाभ घेऊन त्याचे सोन्यामध्ये रुपांतर करण्याच्या सुवर्णदिनाचा आनंद घेता येईल!        संजय एम. देशमुख, संपादक विश्व प्रभात मो. 9881304546

    Post Views:  447


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व