ईडीच्या कारवाया सूडभावनेतून : जयंत पाटील
मलिकांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर; केंद्राच्या विरोधात राज्यभरात आंदोलन
मुंबई : नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली आहे. सर्व कारवाया सूडाच्या भावनेतूनच होत आहेत तर काही लोक षड्यंत्र रचून राज्यातील प्रमुख नेत्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आजपासून राज्यभरात महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात येतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज केंद्रीय सत्ताधार्यांच्या सूडाच्या राजकारणाविरोधात मुंबईच्या चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ज्या सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय त्याविरोधात राज्यात आणि देशात जनभावना तीव्र आहे. जनता याबाबत नाराजी व्यक्त करत असून, राजकीय सूडभावनेची कारवाई भाजपालाही न परवडण्यासारखी आहे, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला.
नवाब मलिक यांनी सार्वजनिक जीवनात तीस वर्षे घालवली आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी नवाब मलिक यांचा आतंकवाद्यांशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाया सूडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकले आहे. महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, युवती प्रदेश उपाध्यक्षा सना मलिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता भाजप आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूने आरोपांचे वार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातले वातावरण सध्या तापले आहे. येणार्या काळात हा संघर्ष आणखी वाढू शकतो.
Post Views: 184