बहीण भावाच्या नात्याचे रक्षण करणारा धागा....!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Aug 2023, 10:53 AM
   

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। 
दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे. 
अशी आख्यायिका आहे . ह्या आख्यायिका म्हणजेच आज आपण साजरा करीत असलेला रक्षाबंधन हा सण. मराठी महिन्यांपैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण मास. श्रावण महिन्यालाच सणांचा महिना असेही म्हणतात.  श्रावणातील प्रत्येक सण हा काही ना काहीतरी शिकवून जातो. या महिन्यात आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य मनाला भुरळ घालतं आणि आपण त्या श्रावण महिन्याचा आनंद घेण्यात तल्लीन होऊन जातो. श्रावणी व्रत , मंगळागौर, रक्षाबंधन, दहिहंडी धम्माल, श्रावणी सोमवार, भक्तिसंप्रदायांत शंभो चे दर्शन घेऊ इच्छिणारी आपली श्रद्धा... अश्या अनेक गोष्टी श्रावणात आपण अनुभवतो. ही आपली भारतीय संस्कृती आहे .
मराठी वा हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीला पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे .
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते.  आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.   
         बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही.  
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| 
यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ll 
ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणी पासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सनाद्वारे केला जातो.
राखी ह्या शब्दातच रक्षण कर - राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.
व्यापारासाठी जहाजावरून व्यापार करणारे तसेच समुद्र किनारी राहणारे  मासे पकडणारे आपले कोळीबांधव या सर्वांना हा उत्सव अतिशय महत्त्वाचा असतो. समुद्रावर वरूण देवतेची सत्ता असते . वरूण देवाने आपल्याकडे आदराने पहावे,  आपले नुकसान करू नये , सागराने सुद्धा आपले नुकसान करू नये म्हणून कोळी बांधव या दिवशी सागरास नारळ अर्पण करून सागराची मनोभावे पूजा करतात.  नारळ हे शुभसूचक फळ असल्याने समुद्राला अर्पण केल्या जाते , म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. रक्षाबंधन हा सण फक्त बहिण भावाच्या प्रेमाचा सण नसून निसर्गपूजा , दर्यापूजा यासारख्या संस्कारशील संस्कृतीची देण आहे .  हा सण शिल , स्नेह  आणि पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. असा हा सण श्रावण महिन्यात येतो तो श्रावण महिना म्हणजे सगळीकडे आनंदीआनंदच होय.  

झुले अंगणी पाळणा
डोले वारुळी नागीण  
लेक आली माहेराला  
आला आला ग श्रावण ....   

भेट सासर - माहेर   
राखीपौर्णिमेचा दिन    
भाऊ - बहिणीचा सण     
आला आला ग श्रावण ....     

नभी कडाडती वीज    
आनंदे गर्जती घन     
सरींवर सरी येती    
इंद्रधनूला घेऊन ....    

लेक निघे सासराला     
अश्रू डोळ्यांत आणून     
निरोप घे माहेराचा     
आला आला ग श्रावण ....    

डॉ . विनय वसंतराव दांदळे ,
वसंतकुंज , गोकुळ कॉलनी ,
अकोला - ४४४००१ .
सुसंवाद : 9822231769 .

    Post Views:  104


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व