अकोला- अमृत अंतर्गत डाबकी रोडवरील जलकुंभाचे काम करण्यास एपी अँड जीपीने नकार दिल्यानंतर त्याच कामाची दुसरी निविदा काढण्यात आली. ही निविदा सुद्धा त्याच कंत्राटदाराने 25 टक्के अधिक दराने भरली, हे माहित असतानाही निविदा स्वीकारली कशी, असा सवाल सेना गटनेते राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सेना व काँग्रेसकडुनही करण्यात आली. मात्र त्यानंतरही सभापतींनी या विषयाला मंजुरी दिली.
स्थायी समितीच्या सभेत अमृत अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील जलकुंभ उभारण्याचा विषय पटलावर आला असता सेना गटनेता राजेश मिश्रा यांनी एपी अँड जीपीवर कुठली कारवाई केली हा प्रश्न उपस्थित केला. अमृत अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामात एपी अँड जीपीने अनियमितता केली असुन हा विषय अनेकदा सभागृहात घेतला, पण काहीही झाले नाही. एपी अँड जीपीने नकार दिल्यानंतर ती कामे कुणाकडुन करुन घेतली याचे उत्तर हुंगे यांनी द्यावे, असा सवाल मिश्रा यांनी उपस्थित केला. यावर कळस असा की, ज्या जलकुंभाचे काम करण्यास एपी अँड जीपीने नकार दिला त्याच कामाचे दुसरे टेंडर त्याच कंत्राटदाराने 25 टक्के अधिक दराने भरले. यावर प्रशासनाने आपत्ती का घेतली नाही, कंत्राटदाराला कुठपर्यंत प्रशासन सहयोग करणार आहे, त्याने नाकारलेली कामे दुसर्यांकडुन का करुन घेतली, अशी प्रश्नांची सरबत्तीच मिश्रा यांनी लावुन धरली. काँग्रेसचे मो. इरफान व पराग कांबळे यांनी एपी अँड जीपीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सभागृहात लावुन धरली. ही निविदा परत बोलवा अशी मागणीही सेना व काँग्रेसने लावुन धरली. मात्र, सभापती संजय बडोणे यांनी या विषयाला मंजुरी दिली.
60 लाखाने किंमत वाढली
ज्या जलकुंभाचे काम करण्यास एपी अँड जीपीने नकार दिला त्याची किंमत 1 कोटी 59 लाख होती. मात्र या कामाची किंमत आता वाढली असुन 2 कोटी 19 लाख झाली आहे. 60 लाखाने ही किंमत वाढली आहे. ही फरकाची रक्कम एपी अँड जीपीकडुन भरपाई घेतली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी सभागृहात सांगितले.
पंजवाणीची निविदा कशी स्वीकारली
ज्या कामासाठी एपी अँड जीपीचे गोपीचंद पंजवाणी यांनी नकार दिला होता. त्या कामाची निविदा गोपीचंद पंजवानी यांनी 25 टक्के अधिक दराने 2 कोटी 25 लाख 15 हजार 211 रुपये या किंमतीची भरली आहे. यानंतरही प्रशासनाने पंजवाणी यांची निविदा बाजुला सारली नाही, याविषयी सेनेने व काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केले.
विविध आठ कामांना मंजुरी
25 लाखांपेक्षा अधिक असणार्या 8 विविध कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. हा निधी पालकमंत्री बच्चु कडु, आ. नितिन देशमुख, आ. गोवर्धन शर्मा यांच्या सहकार्याने महापालिकेला मिळाला असल्याचे सेना, काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी सांगितले.