दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांना मिळेल अर्धा तास अधिक वेळ


राज्य शिक्षण मंडळाची पत्रकार परिषदेतून माहिती
 संजय देशमुख  03 Feb 2022, 8:25 PM
   

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या 14 लाख 72 हजार 562 विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या 16 लाख 25 हजार 311 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. राज्यात दहावी आणि बारावीच्या 60 ते 65 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याची माहिती आहे. परीक्षा देण्यासाठी परीक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल. शाळेत अधिक विद्याथी असल्याचे त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.
अशी आहे नियमावली
-प्रॅक्टिकलसह तोंडी परीक्षा देण्यासाठी दोन संधी असतील. पहिली संधी 14 फेब्रुवारी 3 मार्च दरम्यान असेल. या कालावधीत जे विद्यार्थी लेखी आणि तोंडी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा या परीक्षा देण्याची संधी. 
- जी प्रश्नपत्रिका 40 ते 60 गुणांची आहे त्यासाठी 15 मिनिटे अतिरिक्त मिळणार तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक मिळणार.
- जे विद्यार्थी लेखी परीक्षेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांनाही जुलैच्या आसपास पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी. 
- दुसर्‍यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही.
- तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.  
- परीक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार. 
- जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते.
- प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाहेरचे शिक्षक परीक्षक म्हणून यावेळेस नसतील, तर  त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहीस्थ परीक्षक म्हणून काम करतील. 
- दहावी आणि 12 वीच्या या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात येतील.

    Post Views:  283


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व