कोरोनाने भावाला हिरावले, विधवा वहिनीसोबत दिराने केले लग्न, गावाने केले कौतुक!
अकोले : कोरोनाच्या महामारीत अनेक संसार उद्धवस्त झाले. कोरोनाच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे विधवा झालेल्या आपल्या वहिनाला दिराने जिवनभराची साथ देण्याचा आदर्श निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दिर भाऊजाईचा सामाजिक आदर्श घालून देणारा विवाह नुकताच संपन्न झाला आहे. कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला.
अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे. तरुण पत्नी पुनम अवघी २४ वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनमसमोर जिवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेतला आणि लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. या निर्णयामुळे जिवनातील आनंद गमावलेली पुनमही आनंदी झाली.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती विधवा महिलांसाठी गेली अनेक महिने काम करत आहे. त्यामुळे या अनुकरणीय निर्णयाचे कौतुक करण्यासाठी समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी ढोकरी येथे जाऊन त्या कुटुंबाचा व नवदाम्पत्याचा सत्कार केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याने तरुण विधवांचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपल्या समाजात पुरुष सहजपणे दुसरे लग्न करू शकतो. परंतु तरुण स्त्रीला जातीची, समाजाची, घराण्याच्या परंपरेची, मुले असण्याची कारणे देऊन असा निर्णय घेण्यापासून रोखले जाते. त्यामुळे ही घटना या सामाजिक बंधनांना झुगारून देणारी महत्त्वपूर्ण घटना आहे म्हणून तिचे स्वागत केले पाहिजे व समाजातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील असा विवाह करू इच्छिणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
Post Views: 391