बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही, परिवहन मंत्री परबांचा पुनश्च इशारा
कामगारांचे वेतन वेळेवरच देऊ
मुंबई : एसटी कर्मचार्यांच्या वेतनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यामुळे यापुढे एसटी कामगारांचे वेतन वेळेवरच होणार आहे. शिवाय एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचार्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
बडतर्फ केलेल्या कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेणार का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधानपरिषदेत मंत्री अनिल परब यांना विचारला. यावर उत्तर देताना संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचार्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. दरम्यान, 24 डिसेंबर 2021 पर्यंत 241 एसटी कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. दोन दिवस सुट्टीच्या दिवसातील काऊंटींगवरून हा आकडा आणखी वाढेल अशी शक्यता आहे.
सुरुवातीला निलंबनाची कारवाई झाली. आम्ही आवाहन केले की निलंबन झाले तरी कामावर परत घेईन. कारवाया मागे घेऊ. निलंबन झालेल्यांनी कामावर यावे, दरम्यानच्या काळात जे कामावर रुजू झाले त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या. तरीही अनेक जण संपावर ठाम आहेत. त्यामुळे अशा कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. एकदा बडतर्फीची कारवाई झाली आहे ती मागे घेणार नाही, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून कर्मचार्यांचा संप सुरू आहे. यावर तोडगा म्हणून कर्मचार्यांना वेतनवाढ देण्याचा आणि वेतन वेळेत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर काही संघटनांनी संपातून माघार घेत कामावर परतले तर काही संघटना संपावर ठाम आहेत. या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री अनिल परब यांनी केले होते.
कर्मचार्यांनी अफवांना बळी पडू नये...
कोरोना काळात जे शासकीय सेवेत होते आणि कोविडने मृत्यू झाला आहे अशा केंद्राच्या निकषात बसणार्या किंवा न बसणार्या सर्वांना एसटीने 5 ते 10 लाख रुपयांची मदत केली आहे. शिवाय संपादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या एसटी कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याबाबतची स्क्रुटिनी सुरू आहे. यावरही लवकरच तोडगा निघेल. त्याबरोबरच वेतन वेळेवर मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत त्याला कर्मचार्यांनी बळी पडू नये. आता वेतनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यामुळे एसटी कामगारांचे वेतन वेळेवरच होणार असल्याचे परब यांनी सांगितले.
Post Views: 251