बळीराणी कादंबरीचे २५ डिसेंबर रोजी प्रकाशन


   

अकोट (दि. २० डिसें) : परिस्थितीवर रडून हार मानण्यापेक्षा लढून स्वाभिमानाने जगणे शिकवणाऱ्या शेतकरी महिलेची संघर्ष गाथा असलेल्या सौ. लता अनिल बहाकार लिखित "बळीराणी" या मराठी कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. २५ डिसेंबर रोजी अकोट येथे जेष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. 
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी किरण अग्रवाल (कार्यकारी संपादक दै. लोकमत, अकोला) लाभले आहेत. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक, युवा कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य पुष्पराज गावंडे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले प्रमुख पाहुणे लाभले आहेत. कादंबरीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनय मिरासे, यवतमाळ, तथा डॉ. अनघा सोनखासकर यांचे
भाष्य करणार आहेत. प्रकाशन सोहळ्याला मा. प्रा. गजानन दांदळे (संचालक दांदळे कोचिंग क्लासेस), डॉ. सुचेता पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), राजू चिमणकर (वरिष्ठ पत्रकार), नंदकिशोर नारे (पत्रकार वाशिम), संदीप मालवे (गटशिक्षणाधिकारी अकोट), उमेश अलोणे (युवा लेखक) आणि श्री. अनिल बहाकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोहळ्याचे निवेदन गझलकार दिगंबर खडसे करणार आहेत.

 (बऱ्याच मराठी कादंबऱ्यांनी बळीराजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. मात्र ही कादंबरी बळीराणी च्या संघर्षाला प्रभावीपणे मांडत आहे. ही कादंबरी ग्रामीण जीवनाशी एकरूप झाली आहे. शेती मातीचे भावविश्व रेखाटतांना प्रसंगी बोलीतील निवेदनामुळे कादंबरीचे कथानक ओघवते आणि वास्तविक झाले आहे. कथानक प्रसंग निवेदन मांडणी आणि पात्र अशा अनेक घटकांच्या प्रमाणबद्ध एकत्रीकरणामुळे कादंबरी परिणामकारक झाली आहे. ती आजवरच्या शेतकरी महिलेच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करते.) 

कादंबरीला युवा कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य पुष्पराज गावंडे यांची प्रस्तावना आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमा इंगोले यांचे पाठराखण लाभले आहे. समीक्षा प्रकाशन, पंढरपूर या नामांकित प्रकाशन संस्थेने कादंबरीचे प्रकाशन केले आहे.  सोशल मीडियावर लेखिका म्हणून विशेष लोकप्रियता मिळवलेल्या लता अनिल बहाकार यांच्या अनेक कथामालिकांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या लता अनिल बहाकार यांच्या "बळीराणी" कादंबरीच्या प्रकाशनपूर्व नोंदणीला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "बळीराणी" कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल बहाकार, नीलेश कवडे, तुळशिदास खिरोडकार, विनोद तळोकार यांनी केले आहे.

    Post Views:  251


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व