वारांगना भगिनींचा साडी, नारळ व पानाचा विडा देऊन सन्मान!


राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा माणुसकी जपणारा उपक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Oct 2026, 9:05 AM
   

व्यवसायापेक्षा माणूसपण महत्त्वाचे; प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार — मान्यवरांचे प्रबोधनात्मक प्रतिपादन
कोल्हापूर :  समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायावरून किंवा तिच्या जीवनातील परिस्थितीवरून तिच्या माणुसकीचे मूल्यमापन करणे योग्य नाही. स्त्रीचा सन्मान हा तिच्या परिस्थितीवर नव्हे, तर तिच्या मानवी अस्तित्वावर अवलंबून असतो. समाजातील उपेक्षित घटकांना तिरस्काराची नव्हे, तर सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, असा माणुसकीचा आणि सामाजिक समतेचा संदेश देत वारांगना भगिनींचा साडी, नारळ व पानाचा विडा देऊन सन्मान करण्यात आला.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथील श्रमिक हॉलमध्ये हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक संघसेन जगतकर, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी सुभाष जाधव, जिंदगी ना मिले दोबारा ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली कदम आदी. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेच्या सचिव अनिता काळे यांनी केले. त्यांनी आपल्या स्वागतपर मनोगतात समाजातील प्रत्येक स्त्रीला सन्मान, सुरक्षितता आणि आत्मविश्वासाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या आढावा घेऊन, या उपक्रमामागील सामाजिक भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रस्तावनेत चार शब्द लिहिले - न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पण  ज्या महिलेला समाजाने तिच्या परिस्थितीमुळे या व्यवसायात ढकलले, तिला हे चार शब्द मिळाले का? तिला न्याय मिळाला का? तिला समता मिळाली का? तिला बंधुता मिळाली का? आजही समाजातील कांही घटकांना त्यांच्या परिस्थितीमुळे उपेक्षा, अवहेलना आणि भेदभावाला सामोरे जावे लागते. मात्र, कोणत्याही व्यक्तीचे माणूसपण तिच्या व्यवसायावरून ठरविता येत नाही. वारांगना भगिनींचा सन्मान करणे म्हणजे केवळ भेटवस्तू देणे नव्हे, तर त्यांना समाजाचा एक सन्माननीय घटक म्हणून स्विकारण्याचा आणि त्यांच्या मानवी प्रतिष्ठेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. समाजाने आपली मानसिकता बदलून प्रत्येक व्यक्तीशी समता, संवेदनशीलता आणि बंधुभावाने वागले पाहिजे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक संघसेन जगतकर यांनी सामाजिक संस्थांनी समाजातील वंचित व उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना सन्मान आणि आधार देण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या भगिनी कोणी गुन्हेगार नाहीत. त्या परिस्थितीच्या बळी आहेत. कोणी गरिबीमुळे, कोणी फसवणुकीमुळे, कोणी घरच्या अत्याचारामुळे इथे आल्या. त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला नाही, तर समाजाने त्यांना दुसरा पर्यायच ठेवला नाही. अशा उपक्रमांतून सामाजिक संवेदनशीलता वाढीस लागते आणि माणुसकीची मूल्ये अधिक दृढ होतात, असा संदेश त्यांनी दिला.
निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांनी सामाजिक परिवर्तनासाठी विचारांबरोबरच कृतीचीही आवश्यकता असल्याचे सांगितले. वारांगना भगिनींना त्यांचे संविधानिक अधिकार मिळतात का? त्यांना रेशन कार्ड मिळते का ? त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळायला, त्यांना दवाखान्यात सन्मानाने वागणूक मिळायला किती संघर्ष करावा लागतो?
समाजातील व्यक्तींचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणे हीच प्रगत समाजाची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी सुभाष जाधव यांनी माणुसकी, सामाजिक न्याय आणि बंधुता ही मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन केले. समाजातील कोणत्याही व्यक्तीला तिच्या परिस्थितीमुळे अपमानित केले जाऊ नये. प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी पोषक वातावरण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिंदगी ना मिले दोबारा ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली कदम, गुणवंत कामगार प्रताप घेवडे आणि दिनकर आडसूळ यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांच्या कार्याला पाठबळ देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाची वागणूक देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर पाहुण्यांचे पुस्तकरूपी ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय सासने यांनी आजचा सत्कार म्हणजे त्यांच्यावर उपकार नाहीत. तर आजचा सत्कार म्हणजे संविधानाने त्यांना दिलेला हक्क परत देण्याची सुरुवात आहे असे सांगून, उपस्थित सर्वच मान्यवर तसेच वारांगना भगिणी त्याचबरोबर काँ. अतुल दिघे व कॉ. बलदेव चौगले यांचे आभार मानले.
यावेळी गुणवंत कामगार सुरेश केसरकर, अनिता काळे, संजय सासने, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, संतराम जाधव, प्रताप घेवडे, सर्जेराव हळदकर, सुरेश पवार, भगवान माने, बाळासाहेब कांबळे, पंडीत लुगडे उपस्थित होते.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व