कुरूमचा एसटी थांबा नावालाच! प्रवाशांना पुलावर उतरविण्याचा संतापजनक प्रकार
शिवाई बसच्या चालक-वाहकाच्या वर्तनाबाबत तक्रार; दहा दिवसांत प्रश्न न सुटल्यास राष्ट्रीय महामार्गावर ज
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
26 Oct 2026, 3:50 PM
मूर्तिजापूर : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील कुरूम येथे अधिकृत एसटी बसथांबा असतानाही बसचालक आणि वाहकांकडून प्रवाशांना थांबा नसल्याचे सांगितले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी अमरावतीहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवाई बसमधून कुरूम येथील सुनील भागवत यांना पुलावर उतरविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी चालक आणि वाहकाने उद्धट व अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार जनसेवक तथा भाजपचे माजी जिल्हा सचिव बाबुभाऊ देशमुख यांनी केली आहे.
२३ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर येथे विभागीय नियंत्रक प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आल्या असताना कुरूम येथील बसथांब्याचा प्रश्न लेखी स्वरूपात मांडण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. कुरूम येथून अमरावती, अकोला आणि मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या बस पुलावरून जात असतानाही प्रवाशांना कुरूम येथे अधिकृत थांबा नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार हरीश पिंपळे, अकोला विभागीय नियंत्रक तसेच मूर्तिजापूर, अकोला आणि अमरावती आगार व्यवस्थापकांना पाठविण्यात आल्या आहेत. आता एसटी प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते आणि कुरूमच्या प्रवाशांना न्याय कधी मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दहा दिवसांचा अल्टिमेटम!
कुरूमच्या प्रवाशांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे बससेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच संबंधित चालक-वाहकांच्या वर्तनाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बाबुभाऊ देशमुख यांनी केली आहे. येत्या दहा दिवसांत या समस्येचे निराकरण न झाल्यास कुरूम येथे राष्ट्रीय महामार्गावर सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
Post Views: 80