‘उफान’ व ‘आपडी थापडी’ कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा व निमंत्रितांचे कवीसंमेलन उत्साहात संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
25 May 2026, 10:46 AM
पनवेल : सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई व भारत परिवर्तन फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी अंकुश माला डिगांबर चौरपगार लिखित ‘उफान’ तसेच कवयित्री अश्विनी अतकरे लिखित ‘आपडी थापडी’ या कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा आणि राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन नुकतेच नवीन पनवेल येथील कर्नाटक हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. प्रतिभा सराफ या होत्या. ज्येष्ठ कामगार नेते, साहित्यिक व विचारवंत मा. अविनाशजी दोंड यांच्या हस्ते कवितासंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आंबेडकरी साहित्य, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातील मान्यवर मा. चरण जाधव तसेच युवा गझलकार व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष मा. प्रवीण बोपुलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध व्याख्याता कु. मोनिका काळे व अमोल चरडे यांनी केले. यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक मा. दीपाली घाडगे होत्या. राज्यभरातील विविध कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर करत सामाजिक, विद्रोही, प्रेम, मानवता आणि परिवर्तनवादी विचारांना स्वर दिला. उपस्थित रसिकांनी कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कवींचे स्वागत केले.
प्रकाशित झालेल्या ‘उफान’ या कवितासंग्रहातील सामाजिक जाणीव आणि विद्रोही आशय तर ‘आपडी थापडी’ या बालसाहित्यप्रधान कवितासंग्रहातील निरागस भावविश्व यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. साहित्य क्षेत्रात नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य सर्जनशील पब्लिकेशन करीत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन कवी रामदास गायधने, माधवी मोतलिंग व कवी विलास पुंडले यांनी केले होते. आयोजकांतर्फे सर्जनशील पब्लिकेशनचे प्रकाशक मा. देवेंद्र इंगळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन प्रवीण बोपुलकर यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 4