*एल.आर.टी. महाविद्यालयाच्या पल्लवी सिरसाटचा पुणे येथील आर्मी अटॅचमेंट कॅम्पमध्ये उल्लेखनीय सहभाग*
पुणे येथील औंध मिलिटरी कॅम्पमध्ये १३ महार इन्फंट्री, द महार रेजिमेंट, लाइट इन्फंट्री ब्रिगेड यांच्या वतीने दि. ०२ ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान आर्मी अटॅचमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्प कमांडिंग ऑफिसर नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात अमरावती ग्रुपमधील एकूण ४९ एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला. राज्यातील विविध बटालियनमधून निवड झालेल्या उत्कृष्ट कॅडेट्सना या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. ११ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. मधून एकूण १२ कॅडेट्सची निवड करण्यात आली. त्यामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील कार्पोरल पल्लवी सिरसाट हिची निवड झाली. या कॅम्पमध्ये पल्लवी सिरसाट हिने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. कॅडेट्सना लष्करी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने शिबिरात विविध लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये शस्त्र हाताळणी, जटिल कवायती, नकाशा वाचन, तणाव व्यवस्थापन तसेच विविध मैदानी प्रशिक्षणांचा समावेश होता. कॅडेट्सना रायफल आणि लाइट मशीनगन हाताळणीचे प्रशिक्षण देखील काटेकोरपणे देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान कार्पोरल पल्लवी सिरसाट हिने शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची उत्कृष्ट जाणीव दाखवत आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली. तिच्या या यशस्वी सहभागामुळे एल.आर.टी. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पल्लवी सिरसाट हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, प्रा. संजय तिवारी, प्रा. अतुल पिलात्रे यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजीतजी परांजपे, सहसचिव अमितजी सुरेका तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांनीही पल्लवीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 1