जल जीवन मध्ये श्रीकृष्ण माळी देशातून द्वितीय; १५ ऑगस्टला दिल्लीत होणार सन्मान!
जगजीवन मिशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत बाखराबादचा डंका
अकोला : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चित्रफित स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील बाखराबाद गावचे प्रगतिशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण माळी यांनी संपूर्ण देशातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे बाखराबादसह संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागात पाणी बचत, जलसंवर्धन आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल आता थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. देशभरातील स्पर्धकांमध्ये मिळविलेल्या या यशामुळे अकोल्याच्या सामाजिक कार्याचीही देशपातळीवर ठळक नोंद झाली आहे.
लाल किल्ल्यावर होणार गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल १५ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमात श्रीकृष्ण माळी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून मिळालेल्या या विशेष निमंत्रणामुळे बाखराबादच्या कर्तृत्वाची चर्चा आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
शेती, समाजकार्य आणि जलजागृतीचा त्रिवेणी संगम साधत देशपातळीवर मिळविलेला हा सन्मान अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
चौकट | राष्ट्रीय यशाबद्दल माळी यांचा सत्कार
केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनअंतर्गत आयोजित स्पर्धेत देशपातळीवर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल श्रीकृष्ण माळी यांचा अकोल्यात सत्कार करण्यात आला. यावेळी अकोला महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद मापारी, प्रा. दादाराव पाथ्रीकर, प्रा. चंद्रकांत पोरे, प्रमोद मुरुमकार, पंजाबराव वर, गजानन तराळे, अरुण मानकर, डॉ. प्रमोद मापारी, श्रीनिवास पावसाळे, संजय इंगळे, मनोहर मानकर, विठ्ठल गाडे, प्रा. विनायक धोरण, प्रा. रामेश्वर पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी माळी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 7