पंढरपुरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य सामुदायिक प्रार्थना, खंजरी भजन व कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Aug 2026, 3:24 PM
   

अकोला : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील ऐतिहासिक हनुमान मैदानावर भव्य सामुदायिक प्रार्थना, खंजरी भजन व कीर्तनाचा सोहळा हजारो वारकरी भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सलग चाळीस वर्षे पंढरीची वारी करून याच हनुमान मैदानावर अखंड खंजरी भजनाची सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली होती. त्यांच्या या पावन परंपरेचे जतन करत गेल्या पंधरा वर्षांपासून येथे सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन होत आहे. मागील दोन वर्षांपासून या उपक्रमाला अधिक भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झाले असून, यंदाच्या सोहळ्यालाही हजारो वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात खंजरी भजनाने झाली. सुप्रसिद्ध गायक श्री गोपाल सालोडकर यांनी आपल्या ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर अभिजीत लोखंडे, हार्मोनियमवर विजय वाहोकार, भजनाचे सुंदर निरूपण  ह.भ.प. सुनील महाराज लांजुळकर केले तसेच ह.भ.प. शिवदास महाराज शृंगारे, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे, रोशन गावंडे, ह.भ.प. संकेत महाराज काळे, प्रवीणभाऊ कणसे, अभिजीत बेलूरकर, गोपाल गायकवाड, गौरव काळे, लखन गीते, नारायण आत्राम आणि विजय माथने यांनी सुरेल साथसंगत देत भजनाला अधिक रंगत आणली.
यानंतर सामुदायिक प्रार्थना अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. श्री विजय वाहोकार यांनी सुमधुर स्वरांत सामुदायिक प्रार्थनागीत सादर केले. सामुदायिक प्रार्थनेचे आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व स्पष्ट करत ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे यांच्या प्रभावी कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्यास भाऊसाहेब थुटे, सुधाकरराव वाढोवणकर, माणिकदास बेलूरकर, सुशील महाराज वनवे, डॉ. प्रकाश आमले, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज, पंकज पाल महाराज, अमोलभाऊ सालोडकर, सुरेंद्र नावडे तसेच असंख्य वारकरी, गुरुभगिनी व गुरुभाऊ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतांची माहेरभूमी असलेल्या पंढरीत पांढऱ्या शुभ्र आणि भगव्या टोप्यांनी सजलेला वारकरी समुदाय या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. भक्ती, समता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटविला.
ज्या पवित्र भूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजरी भजनाच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांना भक्तीचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला, त्याच पावन स्थळी गेल्या दोन वर्षांपासून हा सोहळा अधिक भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर, सामुदायिक प्रार्थनेचा संदेश आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीपरंपरेचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व