राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन व प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2026, 9:12 AM
   

नवीन पनवेल : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल व सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांचे कवी संमेलन व प्रकाशन सोहळा कर्नाटक आंध्र संघ हॉल, सेक्टर-२, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात व साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष प्रा. राजन लाखे होते. तर राज्यस्तरीय निमंत्रित कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी मा. एकनाथ आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात लेखिका रंजना कराळे यांच्या 'झिली' कवी अमोल जीजा प्रभाकरराव चरडे यांच्या 'जश्न डोळ्यात आसवांचे', कवयित्री दिपाली विवेक घाडगे यांच्या 'काजळतीट' तसेच लेखक विलास नरहर पुंडले यांच्या 'दान निसर्गाचं' या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे, विचारवंत प्रा. एल. बी. पाटील,लोकस्वातंत्रृय पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय,संपादक संजय एम. देशमुख, सुप्रसिद्ध गझलकार रविंद्र यशवंतराव  यांची विशेष उपस्थिती लाभली.
राज्यभरातून आलेल्या अनेक निमंत्रित कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, निसर्ग, प्रेम, मानवी मूल्ये आणि समकालीन विषयांवरील कवितांना रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. साहित्यिक वातावरणात रंगलेल्या या कवी संमेलनाने उपस्थितांना एक वेगळी साहित्यिक मेजवानी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनीका काळे व सौ. अश्विनी  अतकरे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे संयोजन कवयित्री माधवी मोतलिंग व कवी रामदास गायधने यांनी केले. कार्यक्रमाचे निमंत्रक प्रवीण जगन्नाथ बोपुलकर (अध्यक्ष, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल) तर स्वागतोत्सुक देवेंद्र इंगळकर (प्रकाशक, सर्जनशील पब्लिकेशन, नवी मुंबई) यांनी उपस्थित साहित्यिक, कवी, लेखक व रसिकांचे आभार मानले. संपूर्ण दिवस साहित्य, कविता आणि पुस्तकांच्या सहवासात रंगलेल्या या कार्यक्रमाने नवोदित व प्रस्थापित साहित्यिकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. उपस्थित साहित्यप्रेमींनी अशा उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही अशा साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    Post Views:  57


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व