अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) संघटनेस 10 जून 2026 रोजी 91 वर्षे पूर्ण होत असून 92 व्या वर्षात पदार्पण होणार आहे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
03 Jun 2026, 7:14 PM
( संकलन : सुनील आय.)
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस अर्थात ए.ए.(अनामिक मद्यपी )संघटना ही विश्वव्यापी बंधुत्व निर्माण करणारी संघटना असून दारू या जटील समस्येवर दारूमुक्तीसाठी विनामूल्य मदत करीतआहे.ए.ए.ही संघटना राजकारण,समाजकारण आणि धार्मिकता यापासून दूर असून जात,पात,धर्म,उच्च नीच असा कोणताही भेदभाव करीत नाही.स्वावलंबनाच्या तत्वावर ए.ए.विश्वभरात180पेक्षा जास्त देशांमध्ये सुमारे 1,50,000 समूहांद्वारे 40लाखांपेक्षा अधिक मद्यासक्तांना दारूपासून दूर ठेवण्यात सहाय्यभूत ठरलेली आहे.१०जून १९३५ रोजी ए.ए.संघटनेच्या विचारसरणीचा जन्म अमेरिकेत झालेला असून भारतामध्ये ५ मे १९५७ रोजी या कार्याची सुरुवात झालेली आहे.या भातृभाव संस्थेच्या निर्मितीचा इतिहास आपण जाणून घेऊ या.... अतिमद्यपानाच्या समस्येने त्रस्त असलेले रोलॅन्ड मद्यपी अमेरिकेतील स्विझरलँड येथे डॉ.कार्ल ह्युंग मानसोपचारतज्ज्ञ यांचेकडे उपचार घेत होते.परंतु ते वारंवार दारूकडे वळत असल्याने निराशेच्या गर्तेत सापडले होते.त्यावेळी डॉ. ह्युंग यांनी त्यांना सल्ला दिला होता की,मद्यमुक्ती आणि निराशेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला एखाद्या धार्मिक वातावरणात गुंतवून घेऊन उच्च शक्तीवर जीवन सोपवून द्यावे.तोच मार्ग तुम्हांला उपयोगी पडेल.यातून मानवी शक्तीपेक्षा उच्चशक्तीचा भरवसा दिला गेला होता.परिणामी मानवी अहंकाराचे अवमूल्यन हे ए . ए.संघटनेचे मुख्यसूत्र ठरले. त्यावेळी रोलँडने ऑक्सफर्ड या धार्मिक समुहामध्ये स्वतःला गुंतवलं आणि मद्यमुक्ती प्राप्त केली. १९३२ ते १९३४ या काळात बऱ्याच मद्यपींना या समूहाचा लाभ मिळालेला होता.रोलँड यांनी एबी टी.यांना देखील याच समूहाद्वारे मद्य मुक्तीसाठी मदत केलेली होती.समदुःखी एकदुसऱ्याला समस्या निराकरणासाठी सहाय्यभूत ठरू शकतात ह्या उपायाचे दुसरे सूत्र जन्माला आले होते.पुढे हाच संदेश एबी टी.आपल्या बालपणाचे मित्र बिल डब्लू यांना देतात. पण बिल डब्लू विज्ञानवादी असल्याने त्यांना हा संदेश मान्य करणेअवघड गेले होते.१९३४ च्या उन्हाळ्यात बिल डब्लू डॉ.सिल्कवर्थ मानसोपचारतज्ज्ञ यांचेकडे उपचार घेत असतांना त्यांनी मद्यपीला मानसिक सक्तीचे दडपण आणि शरीराला दारूचे वावडे (ॲलर्जी ) असा मद्यपाश आजार याबद्दलची स्पष्ट कल्पना बिल डब्लूनां दिलेली होती.यातून मद्यपाशापुढे विज्ञानाची हतबलता ही बाब बिल यांच्या लक्षात आल्यानंतर दारूने त्यांचा केलेला पराभव आणि नैराश्य यामुळे बिल यांना एबी टी. यांनी सुचविलेला संदेश ऐकण्याच्या मनःस्थितीत आणून सोडले. नोव्हेंबर १९३४ मध्ये एबी. टी. बिल यांच्या घरी भेटायला येतात तेंव्हा बिल त्या मित्राला दारू पिण्याची ऑफर देतात.पण एबी टी. नम्रपणे नकार देतात. हे पाहून बिल आश्चर्यचकित होतात.एबी टी.पुन्हा त्यांना धार्मिक समूहाची तत्वे कथन करतात.त्यामध्ये दारूपुढे शरणागती, स्वतःशी प्रामाणिकता आणि आत्मशोध,दोषांची कबुली,क्षमा व नुकसान भरपाई,इतरांना विनामूल्य मदत आणि ईश्वराबद्दल चिंतन.ह्या तत्वांच्या श्रवणाने बिल त्यावेळी अस्वस्थ होतात.आणि ही तत्वं आपण स्वतः आचरणात आणून पाहण्यास काय हरकत आहे ? असा विचार त्यांच्या मनामध्ये डोकावतो.त्याच दरम्यान बिल डब्लू डिसेंबर १९३४ मध्ये न्यूयॉर्कच्या चार्ल्स बी टाऊन हॉस्पिटलमध्ये डॉ.सिल्कवर्थ यांचेकडे ॲडमिट होते.तेंव्हासुद्धा एबी टी.दवाखान्यात येऊन ती धार्मिक तत्वे बिलपुढे मांडून निघून जातात.त्यामुळे बिल यांचा अहंकार व हटवादीपणा संपुष्टात येतो.त्यांना प्रचंड निराशा येते.त्याक्षणी बिल अचानक जोरात ओरडले की," एबी टी.कडे जे आहे ते मला प्राप्त होण्यासाठी माझी काहीही करावयाची तयारी आहे.ईश्वराने यासाठी मला मदत करावी " .क्षणार्धात शुभ्र प्रकाशाने हॉस्पिटल लख्ख प्रकाशमय झाले.मी पर्वतावर उभा आहे,चैतन्याची झुळूक त्यांना जाणवली.मी मुक्त माणूस आहे.असा विलक्षण विचार मनामध्ये विजेसारखा चमकला.परंतु काही क्षणात तीअत्यानंदाची भावना हळूहळू ओसरली.त्यावेळी बिल बिछान्यावर होते. जाणिवेच्या नव्या जगात परमेश्वराचे अस्तित्व आहे. त्या विश्वाशी एकरूप होऊन मन शांत झालं होते. थोड्यावेळात आधुनिक शिक्षणाने बिलच्या मनाचा ताबा घेतलाआणि मी वेडा झालो की काय?असे बिल यांना वाटू लागले. हा चित्तथरारक अनुभव बिल डब्लू यांनी डॉ.सिल्कवर्थ यांना ऐकविल्यानंतर डॉ. सिल्कवर्थ म्हणाले की, " हा वेडेपणा नाही,भासअवस्थाही नाही तर हा एक आत्मिक अनुभव आहे.कदाचित यातून तुमची दारूची समस्या सोडविली जाईल".असा आत्मविश्वास डॉक्टरांनी बिल यांना दिला.बिल यांनी डॉ.सिल्कवर्थ यांचे ऋण व्यक्त केले.त्याचवेळी एबी टी.यांनी आणून दिलेले मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांचे धार्मिकअनुभवांचे विविध प्रकार (व्हरायटी ऑफ रिलीजीयस एक्सपीरियन्सेंस) हे पुस्तक बिल यांनी वाचून काढले. संपूर्ण पराभव झालेल्या व्यक्तींनाच परिवर्तनाचे अनुभव येतात या सिद्धांताची अनुभूती आली. १९३४ पासून बिल डब्लू दारूपासून दूर झालेत.आणि पुढील 6 महिने त्यांनी हा संदेश देण्याचे अफाट काम केले.त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मद्यमुक्तीला अर्थ प्राप्त झाला होता.डॉ.सिल्कवर्थ यांनी बिल यांना पुन्हा जाणीव करून दिली की, मद्यपाश आजाराबद्दल वैद्यकीय सत्य आणि लक्षणे हे देखील संदेश देतांना सांगितले पाहिजे.त्यामुळे मद्यपीडितांना स्वतःची ओळख पटण्यास मदत होईल.मे १९३५ मध्ये बिल डब्लू कंपनीच्या कामानिमित्त ॲक्रॉन येथे गेले असतांना त्यांच्या मद्यासक्त मनाला दारूच्या विचाराने घेरले.हा विचार त्यांना भीतीदायक वाटला.परंतु पुढच्या क्षणीच अन्य मद्यपीडिताची भेट घेऊन अनुभवकथन केलं तर स्वतःचा बचाव होऊ शकतो असा विचार प्रकर्षाने बिल यांच्या मनामध्ये आला.आणि त्यांनी पीडितांची चौकशी करण्यासाठी फादर वॉल्टर टंक यांना फोन केला.फादर मार्फत हेनरिटा यांचेशी संपर्क झाला.हेनरीटा यांनी मद्यपी डॉ.बॉब यांच्या पत्नी ॲनी यांचेशी चर्चा केलीआणि दुसऱ्या दिवशी ॲनी व डॉ.बॉब दोघेजण हेनरीटा यांच्या घरी आलेत. डॉ.बॉब यांनी बिल डब्लू यांना चर्चेसाठी केवळ १५ मिनिटे दिले होते.परंतु त्यादिवशी एक चमत्कार घडला की,त्या दोहोंच्या रंगलेल्या चर्चेत रात्रीचे ११ वाजलेत हे त्यांना कळलच नाही.त्या भेटीत बिल डब्ल्यू यांनी डॉ.बॉब यांना उपदेश,सल्ला न देता स्वतःचे सत्यअनुभव,मद्यपाशआणि मद्यासक्तीची माहिती दिली.या प्रदीर्घ चर्चेत डॉ.बॉब असे म्हणालेत की," माझी भाषा बोलणारा पहिला माणूस आज मला भेटला "कारण ती हृदयाची आर्त भाषा होती. १० जून १९३५ पासून डॉ.बॉब यांनी मद्यपान थांबवले.ही अभूतपूर्व भेट दोघांच्या दृष्टीने यशस्वी ठरली. म्हणून १० जून हा दिवस अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा स्थापना दिवस म्हणून जगभर पाळला जातो.वैद्यकीय शास्त्र,धर्मशास्त्र आणि मद्यासक्तांचे अनुभव याच्या मिश्रणाच्या जोडीला परस्परांची गरज ही संकल्पना उदयाला आली. पुढे या उपायातून पहिल्या १०० मद्यमुक्त झालेल्या सभासदांनी १९३९ मध्ये बिग बुक हे पुस्तक लिहिले आणि संघटनेचेच नाव या पुस्तकाने धारण केलेले आहे.
दारूने मिळणाऱ्या आनंदापेक्षाही श्रेष्ठप्रतीचा आनंद प्राप्त होईल अशी प्रभावी योजना आमलात आणणे हाच दारूचे आकर्षण तोडण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.या संघटनेच्या तत्वांच्या आचरणातून तशी जीवन पद्धती आज साकार होत आहे.मद्यपींच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविणे हे ए.ए. संघटनेचे अंतिम उद्दिष्ट आहे.अन्य लोकांच्या दुःखात मदत करतांना स्वतःचे दुःखांना विसरण्याची संधी मिळाली नसती तर आम्ही नष्ट झालो असतो हाच अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसच्या सूत्राचा मूळ गाभा आहे.
या अलौकिक संघटनेच्या स्थापनेस १० जून रोजी ९१ वर्षे पूर्ण झालेलेआहेत.म्हणून संघटनेच्या या कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा व्यक्त करून पुढील उज्वल वाटचालीस अगणित शुभकामना देतो..!!.
Post Views: 1