विवेकानंद संस्थेच्या क्रूर वागणुकीने बेरोजगार वृद्धांचे आमरण उपोषण


वारंवार लाखो रूपये घेऊनही नाव बाहेर फेकल्याने कूटूंबाची उपासमार
 विश्वप्रभात  2025-11-05
   

वृद्धाला त्वरीत न्याय देण्याची बुलढाणा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मागणी
 बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रम,हिवरा बु. येथील कोराडी प्रकल्पात प्रवाशी नाव चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गुलाबराव भाऊराव कांबळे या वृध्द ईसमाकडून नाव चालवण्यासाठी वारंवार लाखो रूपये उकळण्यात आले.त्यानंतरही त्यांची नाव प्रकल्पातून फेकून देत चालवण्यास मनाई केल्याने त्यांचे कुटू़ंबावर उपासमारीची पाळी आली आहे.शासनाकडे पैसे भरावे लागतात ही कारणे सांगून संस्थेच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा त्यांचेकडून पैसे वसूल केले.परत पैशांची मागणी केली असता त्यांनी अगोदरच दिलेले आहेत सांगीतल्यावर सुध्दा त्यांना दमदाटी करून त्यांची नावं जबरदस्तीने प्रकल्पाबाहेर फेकण्यात आली.त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आल्यामुळे झालेल्या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी गुलाबराव कांबळे या वृध्द इसमाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केलेली आहे.गेल्या ४ दिवसातून त्यांच्या पोटात अन्न,पाणी नसल्याने या वृद्धांची तब्येत खालावली असून त्यांचं कमी जास्त जर झालं तर या अमानवीय कृत्त्यासाठी जबाबदार कोण? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहेत.
 त्यांची प्रकृती खालावलेली असतांना आता पर्यंत सुध्दा पाटबंधारे विभाग तथा बुलढाणा प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाची कोणतेही दखल घेतली गेलेली नाही. गुलाबराव कांबळे यांनी विवेकानंद संस्थेच्या लोकांना लाखो रुपये दिलेले आहेत. त्यांच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत.तरीही या संस्थेचे लोक   त्यांना वारंवार मानसिक त्रास देउन पैशांची मागणी करीत आहेत.ते कांबळे यांना सांगतात, कि तुला कोराडी  प्रकल्पात नाव चालवायची असेल,तर शासनाकडे पैसे भरावे लागतात. विवेकानंद संस्थेच्या लोकांकडे पैसे जमा कर, तुला आम्ही त्याच्या पावत्या देतो असे सांगून शासनाच्या नावाने लाखो रुपये विवेकानंद संस्थेच्या लोकांनी गुलाबराव कांबळे यांच्यापासून घेतलेले असल्याचे कांबळे यांचे आरोप आहेत.हे लोक शासनाकडे पैसे भरत नाहीत,स्वतः अपहार करतात आणि नंतर परत पैशांच्या मागण्या करीत आहेत.हे कांबळे यांच्या लक्षात आलेले आहे.वास्तविक पावत्या नुसार त्यांच्याकडे रक्कम बाकी नसतांना सुध्दा विवेकानंद संस्थेकडून त्यांना मानसिक त्रास देणे सुरू होते. एकंदरीत भ्रष्ट कारभार पाहता त्यांनी कंटाळून त्यांना पैसे देणे बंद केले. ४ दिवसांपासून पोटात अन्न नसतांनाही या वृद्धांची दखल घेतली जात नाही. मानवतावतादी दृष्टीकोनातून त्यांच्या तक्रारींवर कारवाई तात्काळ कार्यवाही करून त्याला न्याय द्यावा अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे खामगांव येथील संघटनप्रमुख पत्रकार जगदिश अग्रवाल,सागर मोदी,पंजाबराव देशमुख,वाजीद पठाण (परभणी) जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले, प्रा.मोहम्मद फारुख, रामराव देशमुख व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
     गुलाबराव कांबळे यांनी सांगितले की त्यांनी  आतापर्यंत दोनवेळा उपोषण केलेले आहे.एकदा आत्मदहनाचे निवेदन दिले होते.परंतू वारंवार तक्रारी केल्यावरही  पाटबंधारे विभागाचे काही मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांची कोणतीही दखल घेतली नाही. पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी- कर्मचारी व  विवेकानंद संस्थेचे कर्मचारी  हे परस्परांच्या पंचरंगी  पार्टीतील सवंगडी आहेत. त्यासाठीच ते आपले खर्च आणि मधूर संबंध सांभाळण्यासाठी  या प्रकल्पात नावा चालविणारांकडून  लाखो रुपयांची रक्कम अनाठायी घेत असतात.हेच भ्रष्ट लोक मौसेरे भाऊ असल्याने त्यामुळे कुणाच्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही. माझ्या जीवनाचा अंतिम उपोषण मी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू केले आहे.जोपर्यंत मला न्याय मिळत नाही,तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही. नंतर  जिल्हाधिकाऱ्यांच्या  दालनात जीवन संपविणार असा इशारा  गुलाबराव कांबळे यांनी दिला आहे. माझ्या जाणाऱ्या जीवाची जबाबदारी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि विवेकानंद आश्रम येथील काही पोलिस कर्मचाऱ्यांवर  राहील. माझ्या मृत्यूनंतर या सर्वांवर सदैव मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.त्यांना नोकरीतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्यात यावे.अशी शेवटची ईच्छा व्यक्त करणारी मागणी गुलाबराव कांबळे यांनी केली आहे.

    Post Views:  104


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व