प्रा.डाॅ.दीपाली सोसे राज्यस्तरीय लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार-२०२६ ने सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
04 Apr 2026, 8:16 AM
अकोला : येथील प्रख्यात लेखिका, मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासक, शिक्षणतज्ञ तथा आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन संस्थेच्या संस्थापक प्रा.डाॅ.दीपाली आतिश सोसे यांना नुकताच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा राज्यस्तरीय लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार-२०२६ ने अण्णासाहेब रोकडे सभागृह,अकोला येथे अत्यंत भव्य अशा समारंभामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. या समारंभामध्ये लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख, जेष्ठ साहित्यिका देवका देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका सीमा झावरे,राज्य अन्न आयोगाच्या सदस्य माया इरतकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मंदा देशमुख तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.
प्रा.डॉ.दीपाली सोसे यांनी नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती येथून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आजवर एम.ए. (मराठी).,एम.ए.(इतिहास)., एम.एड.,एम.एस.डब्ल्यू., एम.फिल., रंगभूमी आणि अभिनय या विषयांमध्ये पदविका,नाटक आणि रंगमंच यामध्ये पदव्युत्तर पदविका,समुपदेशनामध्ये पदविका प्राप्त करून विविध विषयांवरील ज्ञान संपादन केले आहे. त्यांनी नाट्यशास्त्र या पदविकेमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक तर बी.एड. सीईटी या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून नवव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकून बहुमान प्राप्त केला होता. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागात 'जिल्हा प्रशिक्षण समन्वयक' म्हणून तसेच महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात पदव्युत्तर विभागात अध्यापनाचे कार्यही केले आहे.
त्यांनी लिहिलेल्या अभिजात मराठी आणि 'माय मराठी' या वर्ग नर्सरी ते वर्ग आठवी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मागील तीन वर्षांपासून केला गेला आहे. मराठी भाषा प्रचार आणि प्रसार तसेच समाजकार्य या विषयांमध्ये सुद्धा रुची घेत त्यांनी आजवर अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. सध्या त्या सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत. आजवर त्यांची विविध विषयांवरील एकूण ६६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अकोला जिल्हा तरुणाई मराठी साहित्य संमेलनाचे आणि नागपूर येथील राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद तसेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय कोंच फिल्म फेस्टिवलचे उद्घाटक पदही भूषविले आहे.
त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आतापर्यंत एकूण साठहून प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी विद्यार्थी आणि महिलांसाठी आनंदी गुरुकुल द ग्रुप ऑफ एज्युकेशन, अकोला या संस्थेच्या वतीने अभिनय, भाषणकला,स्पर्धा परीक्षा, समुपदेशन,व्यक्तिमत्व विकास, नृत्यकला, सूत्रसंचालन, मराठी भाषा निवासी उन्हाळी शिबिर, निवासी हिवाळी शिबिर तसेच दर रविवारी एक दिवशीय आठवडी शाळा असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून अकोला तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी व अभ्यासपूर्ण शिक्षण घेण्यासाठी प्रवेशाच्या संधी आणि नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 7