शेलु बाजारात रक्तदान, नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या संगीतमय जनजागृतीला गावकऱ्यांचा प्रतिसाद
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Sep 2024, 1:33 PM
अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान, नेत्रदान व अवयवदानाची चळवळ संपूर्ण भारतात राबवली जात आहे . सार्वजनिक गणेशोत्सवात दृष्टी गणेशा या संगीतमय जनजागृतीपर कार्यक्रमातून दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे शेलु बाजार येथील गजानन महाराज मंदिरात दिव्यांग बांधवांनी प्रस्तुती दिली . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या कलाकारांनी गणेशगीते,भक्तीगीते,गोंधळ व चित्रपट गीताचा सुंदर कार्यक्रम प्रस्तुत केला. या जनजागृती पर कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांनी रक्तदान , नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प केला.कार्यक्रमात डॉ.विशाल कोरडे , कैलास पानबुडे , लक्ष्मी पाणबुडे व अनामिका देशपांडे यांनी विविध भक्तीगीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .अनंत द्वारकामाई बहुउद्देशीय संस्था व संस्कार गुरुदेव महिला मंडळ ट्रस्ट शेलुबाजारच्या दुर्गा दुगाने यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या विविध सामाजिक उपक्रमाला सहकार्य करण्याचे तसेच ग्रामीण विभागातून गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, महिला बचत गटातील महिलांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या विविध उत्पादन निर्मितीत सहभाग नोंदवून रोजगार मिळवावा असे प्रतिपादन केले . योग प्रशिक्षक श्री.राजू डांगे यांनी दिव्यांग बांधवांनी रोजगार मिळवण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करावे तसेच येणाऱ्या नवरात्री व दिवाळी सारख्या सणसमारंभात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाने तयार केलेली विविध पूजा साहित्य किट व उत्पादने खरेदी करून त्यांच्या कलागुणांना प्रतिसाद द्यावा असे आव्हान केले . श्री गजानन महाराज संस्थान शेलुबाजार तर्फे दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल डॉ.विशाल कोरडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ.विशाल कोरडे यांनी अशा कार्यक्रमाची ग्रामीण विभागात आवश्यकता असल्याचे सांगून ज्या दिव्यांग व गरजू महिलांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नाव नोंदणी करावी अशी माहिती दिली .सदर कार्यक्रमात मंगरूळपीर येथील गीता बजाज यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनचे सदस्यत्व स्वीकारले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिम्मत पानभरे,दिपक जायभाये, संतोष हरणे, संतोष लांभाडे व गजानन डांगे यांनी सहकार्य केले .
Post Views: 122