संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
पाम : बोईसर- तारापूर औदयोगिक वसाहतीतील कारखान्यातून रासायनिक सांडपाणी नाल्यावाटे अनधिकृतपणे सोडले जाते. हे प्रदूषित सांडपाणी जमिनीत झिरपून भूगर्भातील पाणी दूषित होऊन औद्योगिक क्षेत्राच्या काही गावांमध्ये विंधन विहिरीत पाणी रंगीत येण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पाम ग्रामपंचायत हद्दीतील वृदावन नगरी मधील युनायटेड डेव्हलपर्स बिल्डरने आमिष दाखवून फ्लॅट धारकांची केलेली फसवणूक तसेच फ्लॅट धारक मुलभूत सुविधांपासून वंचित असून आता तर चक्क विंधन विहिरीच्या पाण्यामधून लाल रंगाचे पाणी येत असल्याने फ्लॅट धारकांचा आरोग्याचाही प्रश्न उद्भवलेला आहे.
आतापर्यंत अनेक कारखान्यांवर कारवाई केली गेली असतानाही परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे चित्र दिसत नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रात नाल्यावाटे रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ते पाणी जमिनीत झिरपून बोअरवेलचे पाणी प्रदूषित होते. ते पाणी वापरल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊन त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कारखान्यांना नोटीसा ! परंतु परिणाम शून्य...
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून तपासण्यात येत असलेल्या रासायनिक पाण्यातील पीएच, बीओडी, सीओडी, एसएस, टोटल डीझोल्ट सॉलिड (टीडीएस), ऑइल अँड ग्रीस, नायट्रेट, सल्फेटस, फेनोलिक कंपाउंड्स इत्यादी घटक तपासले जात असून मापदंडापेक्षा कमी-जास्त घटक आढळल्यास त्या संबंधित कंपन्यांना वेगवेगळ्ळ्या प्रकारच्या नोटिसा बजवण्यात येतात. परंतु आतापर्यंत अशा हजारो नोटिशी बजावूनही परिस्थिती जशास तशी आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर विभाग-१ कडून तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांना प्रदूषणासंदर्भात जानेवारीपासून १६ कारणे दाखवा नोटीस, ६ प्रस्तावित आदेश, १२ अंतरिम आदेश व एका कारखान्याला बंदचे आदेश बजावण्यात आले आहेत. तर तारापूर विभाग-२ कडून एमआयडीसीव्यतिरिक्त अन्य भागातील रासायनिक सांडपाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने अतिशय मोठ्या प्रमाणात वायू आणि जल प्रदुषण करीत आहेत. वारंवार प्रदूषण महामंडळ तक्रार केली जात असूनही यावर कोणतीही ठोस उपाययोजना करीत नाही. पावसाळयामध्ये तर जाणुनबुजून कारखान्याकडून अधिक प्रमाणात गॅस व रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्याकडून अतिशय घातक वायू सोडलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राच्या गावपरिसरातील शेतकऱ्यांची पिक पेरणी, भात शेती, भाजीपाला जळून नष्ट झाला आहे . कारखान्यांनी सोडलेल्या गॅसमुळे शेतामधील पिके ही नष्ट झाली आहेत.
Post Views: 132