लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : जाहिरात प्रमाणीकरण अर्जाचा नमुना एक खिडकी कक्ष येथे उपलब्ध
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Apr 2024, 8:40 AM
अकोला : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात टीव्ही अथवा केबल नेटवर्कद्वारे राजकीय स्वरुपाची जाहिरात दाखवायची असल्यास नोंदणीकृत राजकीय पक्ष, उमेदवार यांनी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून संबंधित जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. अर्जाचा नमुना एक खिडकी कक्ष (दुसरा मजला, नवीन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला), तसेच माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, जिल्हा माहिती कार्यालय (जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला) येथे उपलब्ध आहे.
नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्य पक्ष तसेच निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास आपल्या जाहिरातीचे प्रसारण होण्याआधी तीन दिवस अगोदर पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर, अनोंदणीकृत पक्ष तसेच इतरांना आपली जाहिरात प्रसारण करण्याच्या सात दिवस आधी पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करता येऊ शकतो. सदर अर्ज समितीसमोर सादर करून त्याला जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मान्यता घेऊन दूरप्रसारणासाठी जाहिरातीचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्यात येणार आहे.
उमेदवाराने जाहिरात प्रमाणीकरणासाठी अर्ज करताना विहित अर्जात माहिती पुर्ण भरावी लागणार आहे. अर्जासोबत टीव्ही अथवा केबल नेटवर्कद्वारे दाखविण्यासाठी संभाव्य राजकीय स्वरुपाच्या जाहिरातीचे योग्य प्रकारे साक्षांकित केलेले इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील दोन प्रतीतील प्रारुप, जाहिरात तयार करावयास आलेला खर्च, जाहिरातीचा वेळ, ब्रेकची संख्या तसेच प्रत्येक टाईम स्लॉटसाठीचा संभाव्य दर, जाहिरात ही उमेदवार अथवा पक्ष यांच्या कार्य कामकाजविषयक असल्याबाबतचे जबाब प्रमाणपत्र आदी तपशीलांसह कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मतदानाआधीचा दिवस व मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणा-या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.
Post Views: 127