तुकईवाडीत आजी आजोबा संस्कार दिन साजरा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2023, 7:03 PM
   

जि.प.प्राथ.शाळा तुकईवाडी येथे आजी आजोबा पूजन दिन साजरा करण्यात आला. आजी आजोबा ही ताटातल्या लोणच्या सारखी असतात, अगदी थोडीच लाभणारी पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवणारी. मनातल्या घडामोडीचा ठाव, अनुभवांच्या उत्तराला वाव, अनंत प्रेमाचं एक गाव आजी आजोबा त्याचं नाव! आजी आजोबा पूजन म्हणजे संस्कारक्षम आयुष्यावर, जशी काळया दगडावर कोरली जाणारी पांढरी रेघ होय. कुटुंब पद्धतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चालला आहे. शहरामध्ये आजी आजोबा मुलांना पाहायला मिळत नाही, मुलांचे संगोपन पाळणाघर व्यवस्था घेऊ पाहत आहे. आज स्पर्धेत आजी आजोबा संकल्पना दूर होत चालली आहे. आजी आजोबा म्हणजे चालते बोलते संस्कारक्षम विद्यापीठ आहे.
   पाय धुवून आजोबांचे नाती व नातूंच्या हस्तेपूजन करण्यात आले. आजी आजोबांचा सत्कार करून त्यांची भाषणे झाली. दररोजच्या दिनाच्या वेगळेपणा म्हणून त्यांचा संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला त्याप्रसंगी संगीत खुर्ची मध्ये क्रमांक प्रथम जयश्री गाढवे, द्वितीय सुभाष गाढवे, तृतीय रामदास कोरडे काढण्यात आले. उतार वयात संगीत खुर्चीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.
   कार्यक्रम प्रसंगी केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष कोरडे, कोमल कोरडे, सीताबाई कोरडे, दक्षता कोरडे उपस्थित होते. कार्यक्रमास खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, खेड बीटच्या विस्ताराधिकारी ज्योती चिलेकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजयकुमार शेटे, निलम आढारी यांनी आभार मानले.

    Post Views:  377


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व