नव्या संसद भवनात योग्य विचारांनी चालण्याची उपरती संसद सदस्यांना होईल का?
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Jun 2023, 2:02 PM
मोठा गाजावाजा करत स्वत:ला नवनार्मितीचे शिल्पकार म्हणून घोषित करीत संसद भवनाची नवी वास्तू साकारीत झाली,आणि २८ मे रोजी उद्घाटनाचे क्षण सर्वानंदाच्या समारंभात जल्लोषात साजरे झाले. त्या वास्तूचे उद्घाटन झाले.देशातील जनतेच्या संविधानिक अपेक्षांवर वरवंटे फिरवत वेदना,आर्त किंकाळ्याच्या निनादात उत्सव साजरे होत असतील त्या स्मृती राहून त्या घटनांच्या जीवंत साक्ष देत राहणार आहेत. आनंदात नाराजीचे विरजण घुसळून ओढून ताणून करवून घेतलेल्या उद्घाटनात अस्तित्वात आलेल्या अशा वास्तू देशातील जनतेच्या अंतरंगातील अपेक्षापूर्तीच्या इमारती ठरू शकतील का? हा एक चिंतनिय प्रश्न आहे.
नव्या संसदभवनाच्या उद्घाटनाचा समारंभ होत असतांनाच महिला पहिलवानांच्या यौनशोषणाविरूध्दच्या न्याय मागण्यासाठी त्याअगोदरच एकत्र आलेल्या होत्या. या उद्घाटनाच्या मुहूर्तातच आरोपी मंत्र्याला पाठीशी घालून त्यांना मात्र ओढत नेऊन हाकलले जाते. संसदभवनासमोरच घडणारी शोकांतिका ही लोकशाही आहे का? यौनशोषणाचा ज्या मंत्र्यावर आरोप आहे त्याला पावन ठरविण्यासाठी पैलवान महिलांवर अन्याय करणे हे पारदर्शक न्यायदानाचे कर्तव्य आहे का? मागील वर्षात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही अशाच हाल अपेष्टा करण्यात आल्यात.त्यांच्या मार्गावर खिळे ठोकण्यापासून तर ते आंदोलन दडपण्यासाठी शक्तीचे नाना अमानुष प्रकार लोकशाहीचा खोटा गाजावाजा करणाऱ्यांनी त्यावेळी घडविले.एवढं करूनही ऐकतच नाहीत तर बापाच्या सत्तेच्या मलिद्यावर जगणाऱ्या केन्द्रीय मंत्र्यांच्या एका माजोरी पूत्राने शेतकऱ्यांच्या जमावात त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे क्रूर नराधमी कृत्य त्यावेळी केले.या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले.त्यांना श्रध्दांजली किंवा साधा उल्लेख करण्याचीही मानवता सरकारने दाखविली नाही.उलट किती शेतकऱ्यांचे बळी गेले याचे अहवालच आमच्याकडे नसल्याची बेजबाबदार वक्तव्ये त्या प्रकरणात करण्यात आली.
अवाढव्य खर्च करून नवे संसद भवन उदयाला आले.ही भव्य वास्तू ऐतिहासिक आणि वैभवशाली ठरणार आणि ती भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशासाठी अभिमानाची गौरवास्पद बाब आहे.यात संशय नाही.परंतू सुसज्ज भिंती आणि नयनरम्य सजावटीने दिमाखाने डोलणाऱ्या या संसद भवनात बसणारे संसद सदस्यही त्या पात्रतेचे ठरले पाहिजेत.आपल्यातील उणिवा शोधून त्या दुर करण्याचे प्रयत्न करून त्यांनी आपल्या त्या सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक कर्तव्याशी प्रामाणिकता राखणाऱ्या आपल्या त्या उदात्त पात्रता आता तरी सिध्द केल्या पाहिजेत.ईमारती बदलल्या म्हणून त्यात बसणाऱ्या माणसांनाही विलक्षण उपरती होऊन त्या बदलण्याच्या मार्गाला लागतील असा विचार करणे म्हणजे दिवास्वप्ने ठरू शकतात,परंतू आशावादी रहायला काही हरकत नाही.
प्रजासत्ताक देशाच्या इतिहासात येथील लोकशाही आणि संविधानाचे जेवढे अवमुल्यन झाले नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक दैवदुर्विलास गेल्या ९ वर्षात या देशाच्या वाट्याला आलेला आहे.लोकशाहीचे संवर्धन होऊन राज्यकारभार पारदर्शकपणे चालण्यासाठी,चुकलेल्या राज्यकर्त्यांवर वेळोवेळी जाणीव देण्यासाठी अंकूश असावा म्हणून संसदभवनात विरोधी पक्षाला एक दर्जा देण्यात आलेला आहे.त्यांनी आपले कर्तव्य ओळखून घटनात्मक पध्दतीने लक्ष ठेवावे,आणि चुकीची ,नुकसानकारक धोरणे आणि निर्णयाविरूध्द संसदभवनात आवाज उठवून न्याय मागावेत ह्या जबाबदाऱ्या विरोधी पक्षाकडे देण्यात आलेल्या आहेत.परंतू ते विरोधी पक्षच देशांमधून संपविण्याचे मनसुबे आखून स्वायत्त संस्थांचा गैरवापर केले जात आहेत. कुटील षड्यंत्रातील आघातांनी त्या विरोधकांचीच कंबरडे मोडण्याची अनैतिक हुकूमशाहीची वाटचाल या लोकशाहीप्रधान देशात सुरू आहे.देशातील विरोधी पक्षांना पूर्वी सन्मानाचे स्थान होते.परंतू सध्याचे चित्र अत्यंत चिंतनिय असून हूकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल ही जनतेसाठी एक चिंताजनक समस्या आहे.बहूमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर दडपशाही ,जबरदस्ती करणे चुकीचे आहे हे संविधानकार बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.परंतू त्यांच्याच नव्हे तर सर्व महापुरूषांच्याही मतांचा अनादर केले जात आहेत.राजकारणासाठी निंदानालस्ती करून आपल्या अघोरी महत्वाकांक्षांचा रथ विरोधक आणि जनता जनार्दनाच्या मुडद्यांवरून पुढे हाकलण्याची निर्लज्ज अमानविय मोहिम सध्या सुरू आहे.
विरोधकांचा आणि देशातील समस्याग्रस्त मायबाप जनतेचा आदर कसा करावा हे भाजपच्या नेत्यांनी ईतर पक्षीय नव्हे तर आपल्या भाजपच्याच पितामहांकडून तरी शिकलं पाहिजे.त्यांनी आठवलं पाहिजे की अटलबिहारी वाजपेयी हे इंदिरा गा़धींचे रणरागिणी म्हणून कौतुक करीत होते .ते पंडीत नेहरूंना ही आपला आदर्श मानत होते.म्हणूनच ते परराष्ट्र मंत्री असतांना त्यांच्या कार्यालयाच्या भिंतीवरील पंडीत नेहरूंचा फोटो त्यांना काढलेला दिसला.त्याचवेळी तो फोटो परत आणून तिथे लावण्याचा आदेश त्यांनी दिला,आणि स्वतःसमोर लाऊन घेतला. कुठे अटलबिहारीजी आणि कुठे हे अनैतिक दंगामस्ती आणि गुंडशाहीप्रमाणे झुंडशाही करणारे भाजपचे असंस्कृत नेते?
विरोधी पक्षिय संसदपटू नाथ पै यांचे भाषण ऐकायला पंडीत नेहरू आवर्जून उपस्थित राहत. माजी पंतप्रधान राजीव गांधींना उपरोधिक टोला म्हणून अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री मधू दंडवतेंनी एकदा सभापतींना उद्देशून म्हटले होते... महोदय मी इंग्रजी भाषा विद्यापीठातून शिकलो, हवाई सुंदरीकडून नाही.एवढा जबरदस्त टोला असल्यावरही अधिवेशन संपल्यावर राजीवजी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचेकडे दिलगिरी व्यक्त केली होती. भाजपनेत्यांनी लक्षात घेण्यासारखी अशी होती ही पप्पूंच्या वडीलांकडे असणारी खानदानी सुसंस्कृतता...! म्हणून नव्या वास्तूत बसतांना त्या नव्या संसद भवनाचा तरी आदर बाळगून परंपरा पाळण्याचं शहाणपण सध्याच्या संसद सदस्यांना दाखवता आलं पाहिजे.या सुजज्ज,आलिशान संसद मंदिरात बसणारी माणसे ही स्वतःमधील मानवतेला जागृत करणारी कर्तव्यपरायण लोकप्रतिनिधी ठरली पाहिजेत.याच भिंतीआड बसलेल्या नेत्यांमध्ये गुन्हेगार किती हा सुध्दा फार मोठा संशोधनाचा विषय आहे.भवन जरी नवीन झाले तरी संस्कार आणि विचारांचे ऐतिहासिक वारसे घेऊन सांस्कृतिक गौरवाने दिमाखात डोलणाऱ्या त्या संसदेचे मुल्य हे उदात्त आणि विशाल आहे. अशा ठिकाणी पावन लोकांशी पतितंतांनीच प्राबल्य वाढणे हीच अराजकता हिच येथील लोकशाहीच्या घाव करणारी ठरते आहे.या नव्या संसद भवनात आता नव्या विचारांनी चालण्याची उपरति या संसद सदस्यांना होईल का? हा प्रश्न मनात घेऊन आशावादी राहण्याचे प्रयत्न आपण करू या..!
संजय एम. देशमुख
मुख्य संपादक विश्वप्रभात
मो. ९८८१३०४५४६
Post Views: 241