हो, आहे माझा बॉयफ्रेंड टॉक शो मध्ये उमटला सूर


सूर पालक मुलांतील संवाद हरवतोय !
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Nov 2022, 2:06 PM
   

अकोला : जग आधुनिक होत गेलं पण आपली मानसिकता तशीच बुरसटलेली राहिली आहे. आधुनिकतेनं नैतिकतेचं परिमान अधिक व्यापक केलं असून समाजात झिरपत असणार्या बदलला खुल्या मनाने आत्मसात करण्याची आणि युवा पिढीच्या भावना आणि अपेक्षा समजून घेण्याची गरज हो आहे माझा बॉयफ्रेंड या टॉकशोमधून व्यक्त झाली. 
राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशी रविवार दि. 6 नोव्हें. रोजी आयोजित या टॉकशोमध्ये, समाज माध्यमाच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य, जिल्हा माहिती अधिकारी भंडारा शैलेजा वाघ-दांदळे, ज्येष्ठ समुपदेशक राजा आकाश, माजी महिला आयोग सदस्य डॉ. आशा मिरगे सहभागी झाल्या होत्या तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी होते. संपूर्ण टॉकशोचे अत्यंत वेधक संचालन संमेलनाच्या समन्वयक सीमा शेटे-रोठे यांनी केले.  
भतीचं सावट दूर सारावं
बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड   असणं आज स्टेटस सिंबल झालं आहे. आज  बॉयफ्रेंड,  गर्लफ्रेंड  नसल्यामुळे मुलांना नैराश्य आलेलं पाहतो. मैत्री ही मुळात शुद्ध असते तरी पण आईला सर्वकाही सांगणार्यामुली आपल्या बॉयफ्रेंडबाबत सांगत नाही. यामध्ये त्यांची भिती असते. मात्र हे भितीचं सावट दूर सारुन त्यांनी पालकांना हे सांगीतले पाहीजे. त्यातून युवावर्गाबाबत ज्येष्ठांच्या मनात असलेलं संशयाचं धूकं सरेल आणि संबंधाचं आकाश शुद्ध आणि स्वच्छ होईल असे प्रबोधन शैलजा वाघ-दांदळे यांनी केले. 
मुलांनी पालकांपुढे मोकळं व्हावं
आज मुलामुलींमध्ये ऑनलाईन डेटींग वाढ झाली आहे. म्हणावं तर याला सोशल मीडिया, वेबसिरिज अन् सोशल मीडियाचा एकत्रित परिणाम जबाबदार आहे. आज मुलं बॉयफ्रेंड   अथवा गर्लफ्रेंड  निवडतांना त्यांची एकंदर कम्पॅटीबीलीटी अर्थात अनुरुपता बघतात. त्यांमधून त्यांना संबंधाचा स्थायित्वाचा शोध घ्यावयाचा असतो. त्यांच्यावरील पालकांच्या अथवा समाजाच्या दबावामुळे अथवा चुकीच्या वरचष्म्यामुळे त्यांच्या संबंधातील शुद्धतेवर प्रश्नचिन्हं येत राहतं. मात्र यातून प्रश्न बिकट होतात. त्यामुळे मुलांनी पालकांपुढे मोकळं व्हावं आणि पालकांनीही ते डोळसपणे स्वीकारण्याची गरज मुक्ता चैतन्य यांनी अधोरेखित केली.   
पालक-मुलांमध्ये प्रांजळ संवाद हवा!
तंत्रज्ञानाची आधुनिकता आली मात्र समाजातील मानसिकता अजूनही पुरुती आधुनिक नाही झाली. केवळ स्वतंत्र विचाराचे असण्याचा दंभ मिरविल्या जातो, मात्र अंतरंगात अजूनही बुरसटलेले संस्कृती दडलेली आहे. आमचा प्रेमविवाह आहे, ही बाब प्रेमविवाह करणारी मंडळी त्यांच्या मुलांपासून लपवून ठेवण्यात धन्यता माणतात. कुठलही अवडंबर न करता मुलांशी संवाद साधनं गरजेच आहे. योनीसुचिता आणि मनूवादी विचारसरणीमुळे आजही ऑनर किलींग सारख्या घटना घडत असल्याचे वास्तव डॉ. आशा मिरगे यांनी मांडले. 
पालकाची निरपेक्ष प्रेमाची पाठीवरील थाप हवी  
पालकांनी मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे प्रश्नचिन्ह म्हणून पाहता त्यांचं विश्व अधीक डोळसपणे बघण्याची गरज आहे. पालक-मुलांमधला कमी होत जाणारा संवाद वाढविण्याची खरी गरज आहे. केवळ मुलांना अभ्यासाची विचारपूस करणे, त्यांंच्या गरजा पुरविणे म्हणजे मुलांचं संगोपण नाही. आज पालक मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात धन्यता मानतात. पण मुलांची मागणी पूर्ण करणे म्हणजे संवाद नाही. मुलांशी संवाद साधायला खूप वेळ देणं गरजेचे नाही. कधी स्पर्शातून होणारा संवादही महत्त्वाचा असतो. मुलांच्या पाठीवरची थाप अथवा त्यांना दिलेली मिठी भावना व्यक्त करुन जातो. मुलांना पालकांना काही सांगायचं असतं, पण वडीलांना सांगीतलं तर ते रागावतील अशी भिती त्यांना असते. आज संवाद लोपल्यामुळे युवकांच्या आत्महत्या वाढत असल्याचे वास्तव राजा आकाश यांनी अधोरेखित केले. त्यामुळे पालकांनी निरपेक्ष प्रेमाची अन् स्वीकाराची बाजू ठेवायला हवी. असे सकारात्मक वातावरण घरात असेल तर मुलंदेखील चुकीच्या मार्गाला लागत नसल्याचे प्रतिपादन राजा आकाश यांनी केले.  
प्रेमाला प्रेमानेच जिंकता येतं
मैत्री जशी मुळातच सुंदर असते तसच प्रेमही. प्रेम हे कुठल्याही वयात करता येतं कारण प्रेम ही भावना आहे आणि विवाह ही अपेक्षा. प्रेमाचा कधीच भंग होत नसतो तर भंग अपेक्षांचा होत असतो. त्यामुळे प्रेम जीवघेणं न बनविता ते जीवनदायी बनवावं. आज घरात आजी आजोबा नसतात. त्यामुळे कुटुंबातली रचनाच मुळी एकाकी झाली आहे. पूर्वी आई-बाबा विरुद्ध आजी-आजोबांकडे दाद मागितली जायची. मात्र बदलेल्या कुटुंबपद्धतीने संवादच मारला आहे. पालकांना आपल्या मुलांचं मन जिकायचं असेल तर प्रेमानेच जिंकता येत असल्याचा मौलिक संदेश बाळ कुलकर्णी यांनी दिला.

    Post Views:  225


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व