गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. मात्र, यातच आता आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून, त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेश
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवरही सडकून टीका केली. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.तसेच शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले.
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यावर सत्ताधारी अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप आम्ही महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Post Views: 285
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay