शैक्षणिक प्रतिकृतीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करता येते- शिक्षणाधिकरी डॉ. पाटेकर


प्रभातमध्ये मुख्याध्यापकांची कार्यशाळा: जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
 Pankaj Deshmukh  26 Nov 2021, 8:45 PM
   

अकोला: मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा तसेच त्यांची निरिक्षण क्षमता विकसित व्हावी या हेतूने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जात असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांची भूमिका मोलाची असून त्यांनी साध्या, सोप्या वैज्ञानिक तसेच गणिती प्रतिकृतीच्या माध्यमातून शिक्षण दिल्यास विद्यार्थी सहजेतेने आत्मसात करतील व त्यांचा विविध स्पर्धा परीक्षांमधील सहभाग वाढेल, असा आशावाद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर यांनी व्यक्त केला.  त्या जिल्हाभरातील मुख्याध्यापकांसाठी प्रभात किड्स स्कूल येथे दि २६ नोव्हे रोजी आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा कार्यशाळेत बोलत होत्या. या कार्यशाळेचे आयोजन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, अकोला जिल्हा अध्यापक मंडळ आणि प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्दमाने करण्यात आले होते.    
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स स्कूलचे  संचालक डॉ. गजानन नारे होते तर जालना येथील शासनाचा पुरस्कार प्राप्त प्रयोगशाळा कर्मचारी  संजय टिकाडीया, गटशिक्षणाधिकारी (अकोला) शाम राऊत, गटशिक्षणाधिकारी (मुर्तीजापूर) संजय मोरे, गटशिक्षणाधिकारी (तेल्हारा) दिनेश दुतंडे तसेच विज्ञान अध्यापक मंडळाचे डॉ रविंद्र भास्कर यावेळी प्रमुख्याने उपस्थित होते.
   गणित  विषय क्लिष्ट असला तरी अगदी सोप्या आणि सहजतेने उपलब्ध होणाऱ्या गणित प्रतिकृतीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करता येते. त्यासाठी शिक्षकांकडून अशा गणित प्रतिकृती निर्माण व्हाव्या यासाठी राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून गणित प्रतिकृती प्रदर्शन २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी सांगीतले. तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्यासाठी जिल्हा स्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.  
   विशेष अतिथी संजय टिकाडीया यांनी अगदी सहज उपलब्ध बाबीपासून गणित तसेच विज्ञान प्रतिकृती करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले व उपस्थितांसोबत अनेक विविध प्रतिकृतीचे दाखले देखील दिले.
  कोविडनंतर आता आव्हानं वाढली असून विद्यार्थ्यांची मानसिकता सांभाळत त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. सोबत बदलत्या काळासोबत शिक्षणाच तंत्र प्रासंगिक ठेवणेही अगत्याच असल्याचे प्रतिपादन डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.
  कार्यक्रमांच्या आरंभी प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विज्ञान अध्यापक संघाचे डॉ. रविद्र भास्कर यांनी केले. या कार्यशाळेत जिल्हाभरातून आलेल्या मुख्याध्यपकांनी सहभाग घेतला.

    Post Views:  302


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व