पेट्रोल 5, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले निर्णय
मध्यरात्रीपासून अंमलबजावणी; इंधनावरील व्हॅटमध्ये कपात
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Jul 2022, 7:43 PM
मुंबई : राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोजा पडणार आहे. या निर्णयाने राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर हे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. केंद्राने 4 नोव्हेंबर 2021 आणि 22 मे 2022 रोजी करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनाही आवाहन केले होते. काही राज्यांनी कर कमी केले होते. मात्र महाराष्ट्रात ते कर कमी झाले नव्हते. त्यामुळे आम्ही पेट्रोलवरील करात 5 रुपये आणि डिझेलवरील करात 3 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेत दिली.
केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवरील करात दोन वेळा कपात केली होती. मात्र राज्यात सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट घटवला नव्हता. दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर विधानसभेत विश्वासमत जिंकल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
शेतकर्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला आहे. नियमित कर्जाची फेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकर्यांनी देखील ही मागणी केली होती. लाखो शेतकर्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा
निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन
देशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना पूर्वीप्रमाणेच मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेंतर्गत 1 ऑगस्ट, 2022 पासून मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 10 हजार रुपये आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा 5 हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस 2 हजार 500 रुपये इतके पूर्वीप्रमाणेच मानधन देण्यात येईल.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय
- पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
- राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान राबविण्यात येणार.
- केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबविणार
- नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
- राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार.
-जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
-बाजार समितीतील सर्व शेतकर्यांना थेट मतदानाचा अधिकार.
-आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु करणार.
Post Views: 222