सत्तांतरांच्या अति महत्वाकांक्षांनी विकास आणि समाजजीवन संकटात..! : संजय एम.देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Jul 2022, 5:29 PM
   

अभिमन्यू चक्रव्यूह मे फस गया है जो... कोणत्याही विषयातील अर्धवट प्राविण्य माणसाला समस्यांच्या चक्रव्यूहात अडकवते.जाण्याचा रस्ता माहिती असतो.त्या प्रवासात मजाही भरपूर असते डोंगर,झाडी,हाटील सगळं काही वोक्के असते.परंतू त्यावेळी योग्य वाटत असलेल्या गोष्टींनंतर जर त्या त्रासदायक ठरल्या तर परतीचा रस्त्याचेही ज्ञान असले पाहिजे.नाहीतर त्या डोंगर आणि झाडीमध्ये स्वप्ननगरीच्या हाटीलात माणूस पूर्णपणे अडकून जाण्याचीही भिती असते.म्हणून सुरूवात करण्याअगोदर शेवट कसा राहील यांचाही विचार झाला पाहिजे.तो दुर्दैवाने होत नाही.ज्याच्या हातात फासा तो पारधी अशी एक म्हण आहे.त्याप्रमाणेच आज साम,दाम,दंड भेदाने,ईडीसारख्या आणि इतर स्वायत्त संस्थांच्या दमदाटी जोमात आहे आणि विरोधी पक्ष कोमात आहे. मनाला वाटेल तशी अनुकूल परिस्थिती तयार करण्यासाठी लोकशाही,संविधानावर आघात करून अनेक पक्षी एकाच वेळी पाशात अडकविण्यासाठी सुपर पॉवर पारधी सध्या देशात सक्रिय झालेले आहेत. त्या पारध्यांनी दाखविलेल्या मोहक,स्वादिष्ट खुराकीच्या वासाने अनेक पाखरं आज संमोहित होऊन,पराधिन,लाचार आणि अगतिक होऊन त्यांच्यामागे सुसाट धावत आहेत हा लोकशाहीतील सर्वात मोठा दैवदुर्विलास आहे...!
         ‌‌                      स्वार्थाच्या मोहात,आणि अस्तित्वाच्या अघोरी महत्वाकांक्षेने मेंदू गहाण ठेवली जातात. विचारांनी पराधिन झालेली पाखरे गुलामी पत्करता पत्करता संमोहित आणि विचारहिन होतात.मग त्यांना थोडे आमिष आणि हळूच तोंडासमोर ठेवलेले खाद्य ओढून घेण्याची थोडी जरी भिती दाखविली तर ते आपल्याला मिळावं म्हणून ती  खाद्य टाकणाऱ्या फासेपारध्यांच्या मागे सारखे धावत राहतात.त्यात त्यांना कितीही त्रास झाला तरी ते मिळवल्या शिवाय त्यांना चैन पडत नाही.अशीच गोष्ट पट्टीच्या बेवड्यांचीही असते.त्याला दारू कोणत्याही मार्गाने मिळविल्याशिवाय चैन पडत नाही.मग हळूहळू त्यांना त्या अगतिक होऊन पत्करलेल्या वाटचालीची सवयच होऊन जाते.हे सत्त्य हिटलरने इतिहासात पटवून दिलेले आहे.त्याने कोंबडी बोलावली,त्या कोंबडीचे निर्दयीपणे एक एक पंख उपटून जमिनीवर टाकत गेला.कोंंबडी ओरडत होती...विव्हळत होती. परंतू सत्तेची मस्ती चढलेल्या अमानुष क्रूर हिटलरला त्याची पर्वा नव्हती.कारण तो माणसात राहि लेला नव्हता.सर्व पंख काढल्यावर रक्तबंबाळ झालेला मांसाचा गोळा त्याने जमिनीवर टाकला,आणि धान्याचे दाणे हातात घेत ते जमिनीवर टाकत समोर चालत राहिला.त्यासरशी रक्तबंबाळ झालेली कोंबडी पायावर उभी झाली.त्या धान्याच्या दाण्यांसाठी ती हिटलर च्या मागे मागे जात राहिली.हा आहे गुलामगीरी, पराधिन वाटचालीची सवय झाल्यानंतरचा एक चमत्कार ...!
                       स्वार्थासाठी अनैतिकता,समाजाप्रती ची असंवेदनशीलता आणि सत्तेच्या आणि पापाच्या मलिद्यासाठी अघोरी महत्वांकांक्षा,आणि मग त्या चोऱ्या लपवण्यासाठी जनतेची आयुष्ये डावावर लावून पत्करलेली वैचारीक गुलामगीरी..... हा लोकशाहीला ग्रहण लावणारा सर्वात मोठा धोका आहे.तो सामाजिक प्रगती,आनंद आणि स्वास्थ्याला अडचणीत आणून देशाच्या आर्थिक विकासाच्या मार्गात उद्भवलेले विनाशकारी संकट ठरू शकतो.त्याचे संभवणारे परिणाम चिंतनशील,समाजनिष्ठ लोकच फक्त ओळखू शकतात.सामाजिक कर्तव्य विसरून मतलबाच्या दलदलीत आकंठ बुडालेले फक्त स्वप्ननगरीच्या बजबजपूरीतच वळवळत राहतात.ते अविचारी आणि दिशाहीन लोक कालांतराने स्वत:लाही विनाशाकडे नेऊन सामाजिक जीवनाला आणि आपल्या दळभद्री कर्माच्या धक्क्यांनी देशाच्या विकासाला संकटाला आणून अशांततेच्या गर्तेत ढकलत असतात.
                  देशाच्या इतर राज्यातील सत्तांतरे अघोरी लोकशाही आणि संविधानाला हादरे देऊन,अघोरी बळांचे वापर करून घडविलेल्या घटना अशाच प्रकारात मोडणारी आहेत. देशाच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण करणाऱ्या  विनाशकारी,अमानुष घटना आहेत.अनैतिकतेने उभारलेल्या ह्या सत्तेच्या ईमारतींचे ढाचेच मुळात अनाचार,अप्रामाणिकतेच्या संविधानविरोधी तत्वांवर उभारलेले आहेत.त्यामुळे ही वाटचाल ना देशाच्या हिताची ठरते ना सामाजिक विकासाचा आधार....! असे गैरप्रकार म्हणजे जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा ठरते. या गोष्टीची तिळमात्रही खंत वाटू नये एवढे निगरगठ्ठ विश्वासघातकी नेते म्हणजे स्वतंत्र भारतातील लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
                           महाराष्ट्रातील आमदारांनी बंडखोरी करीत सर्व जनतेच्या घामाच्या करोडोंच्या चुराड्याने निर्लज्जपणे मौजमजा करीत सत्तांतर घडवून आणले.आता खासदारही केलेल्या अनाचाराने भ्रमित होऊन भ्रष्ट कमाईची पितळं उघडी पडण्याच्या संभाव्य भितीने गलितगात्र झालेले आहेत.त्यामुळे ते सुध्दा आता राष्ट्रपती निवडणूकीसाठी भाजपच्या बाजूने येण्याची आर्जवी विनंती उध्दव ठाकरेंना करीत आहेत.महाराष्ट्रात बाकी राहिलेल्या अडीच वर्षासाठी फक्त बेगडी हिंदुत्व आणि अनेक खोट्या तकलादू कारणांचा आधार घेत या नेत्यांनी फक्त स्वतःचंच भलं करून घेतलं.या विजयात फडणविसांचा अहंकार आणखी  बहरला. यामध्ये जनतेच्या हिताचा कोणताही मुद्दा नाही.उलट आता सोबत घोषणांचा पाउस पाडीत काही आमिषं दाखविली.मात्र लगेच गॅसचा दर ५५ रूपयांनी वाढवला.आता अस्थिरतेतून मध्यावधी निवडणूकांचं संकट जर आलं तर महागाईच्या रूपाने परत जनतेला आर्थिक संकटात आणलं जाणार.म्हणजे हे अविचारी,असंवेदनशील डोंगर,झाडी,हाटील करत फिरत राहणार आणि यांच्या पापांचे आर्थिक बोझे जनता उचलत राहणार.काय करावं या निर्लज्जपणाचं...?
              याबाबत चिंतन करून अशा नेत्यांविरूध्द जनतेने उठाव केला पाहिजे.त्याशिवाय  ह्या‌ अनीतीने पोसल्या जाणाऱ्या बेशरम वल्लींचे खच्चिकरण होऊ शकणार नाही.
           राज्यातील बंडखोरीनंतर आता ईडीच्या संभाव्य पिडेने  धास्तावलेले खासदारही स्वतःच्या  माना वाचविण्यासाठी देशातील समाजजीवन संकटात आणणाऱ्या भाजपलाच संरक्षित करण्यास सरावलेले आहेत.अरे एवढी भिती आहे तर लाज लज्जा सोडून भ्रष्टाचार करता कशाला?तुमचे जीवन वाचवण्यासाठी जनतेची आणि कुटूंबाची आयुष्ये डावावर लावता कशाला? ज्याने पापं केलीत त्याची त्यानेच भरावित.जनतेने तुम्हाला निवडून दिले म्हणून तुमच्या कोणत्याही अनाचारात वाटा उचलून तुम्हाला संरक्षित करण्याचे ठेके घेतलेले नाहीत.तुमची सत्तांतरे आणि तुमची मंत्रीपदे तुम्हाला लखलाभ असो.जनतेला त्याचेशी किंवा तुमच्या सत्तांतराशी काही देणे घेणे नाही.अशा समाजप्रतारक लाचारांबध्दल संत तुकाराम म्हणतात अशा पापी नरा मोजून माराव्यात पैजारा.जनता आता कंटाळली आहे...!संतापली आहे..! त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट जर झाला तर त्यांना रस्त्यावर उतरून खऱ्या मानवता धर्माचे रक्षण करण्यासाठी ,समाजधर्माची जाणीव देण्यासाठी संतांनी नाठाळांसाठी सांगीतलेल्या धर्मवचनांचाच आता  अवलंब करावा लागेल.  नाहीतर सत्तांतराच्या अशा या अस्थिर वाटचाली म्हणजे विकास आणि समाजजीवनावर कोसळणारे संकट ठरेल..!
संजय एम.देशमुख,
जेष्ठ पत्रकार मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  271


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व