बोलून कुणाचेही मन दुखवू नये ? म्हणजे नेमके कुणाचे? : संजय एम. देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  29 Jun 2022, 5:49 PM
   

              कुणाचे मन दुखवू नये.. कुणाला त्रास देऊ नये.. कुणाला दु:ख देऊ नये..!कुणाला वेदना देऊ नये..!  कुणाचं वाईट चिंतू नये....नाही तर त्याची अशुभ फळं आपल्याला मिळतात. कुणाचंही शुभचिंतनच करावं ...मग देव आपलं भलं करतो...म्हणजे कोर्टाच्या न्यायाधिशांप्रमाणे देवाला मध्ये टाकून, त्यांच्या कृपेच्या अपेक्षांचं भलं मोठं ओझं आमच्या मनावर टाकण्यात आलेलं आहे. आम्ही कुणालाही दुखवूच नये...काही म्हणून नये.म्हणजे नेमकं कुणा कुणाला यातला फरक  समाजाला एवढ्या वर्षातही समजला नाही,आणि तो समजून घेण्याचेही कष्टही असंख्य लोकांनी  केलेले नाहीत.त्यामुळे समोरील व्यक्तीचं कितीही चुकत असेल....त्यांच्यामुळे आमचंही नुकसान होत असेल, तो इतरांनाही त्रास देत असेल तरीही आपण मध्ये पडू नये....असे  संस्कार त्या सत्त्ययुगातल्या काळाचा विचार करून आमचेवर आमच्या वरिष्ठांनी करून ठेवलेले आहेत. आम्ही ते प्रामाणिकपणे तंतोतंत त्याचे आज्ञाधारकपणे पालन करीत आलो आहोत. 
              वारसाहक्काने तेच विचार समोरच्या पिढीच्या सुपूर्द करत करणार आहोत.वरून परमेश्वराचीही भिती मानगुटीवर ईडी या भ्रष्टाचाऱ्यांच्या तपासयंत्रणासारखी (खरी की खोटी याबाबतचा संभ्रम बाजूला ठेऊन)   जबरदस्त बसविलेली आहे.त्यामुळे आज काळ कितीही बदललेला असेल तरीही झापर्डे लावलेल्या घोड्याप्रमाणे आम्ही ठरवून दिलेला चाकोरीबद्ध मार्ग वर्षानुवर्षांपासून अनुसरतो आहोत.
            ‌‌     व्यवहारीक जगतात बदललेल्या काळासोबत व्यक्तीही बदलतात,विचार बदलतात. आमच्यावर चांगल्या वागणूकीचे व विधायक विचारांचे संस्कार झाले.ती संस्कार आणि विचारांची शिदोरी आम्हाला वारसाहक्काने मिळाली. ती संपत्ती आमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आदर्श जीवनही प्राप्त करून देईल यात तिळमात्रही शंका नाही.परंतू त्याबाबतित कुठे कुठे अपवाद असले पाहिजेत. हे समजून घेऊन वैचारिक परिवर्तनातून प्रयोगशील राहण्याचे बदलही समाजाने आत्मसात केले पाहिजेत.ज्यावेळी अशा या संस्कारांतील विधायक  विचारांची सर्वांगसुंदर निरोगी समाजामध्ये प्रतिष्ठापना झाली, त्यावेळी सज्जन,सदाचारी,सेवाभावी लोक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होते.प्रामाणिक विचारांचा आणि नैतिक वागणुकीचा प्रभाव आणि चांगल्याबाबत आदर असणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणिय होते.
           आता समाजात  दुराचरण करणाऱ्या अपराध्यांच्या अनाचाराच्या तऱ्हा बदलल्या, व्यभिचाऱ्यांच्या सराईतपणाच्या हिंमतीमध्ये कितीतरी पटीने वाढ झाली,अनेक चोरमार्ग आणि नानाविध फंडे हातात लागल्याने चोरही बुध्दीमान होत गेले.त्यामुळे त्यांचे चोऱ्यांचे काळे धंदे उजळ माथ्याने करण्याचे प्रकारही बदलले आणि प्रमाणही वाढले.मग नविन नविन परिनाम,दुष्परिनाम समोर आल्याने त्यांना शिक्षा देण्यासाठी जुणे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यांना ओळखूही शकत नाहीत,हे जेव्हा आमच्या न्यायव्यवस्थेच्या आणि शासनकर्त्यांच्या लक्षात येत गेले  तेव्हा या कायद्यांमध्ये अत्त्यावश्यक सुधारणा केल्या गेल्या, ते बदलले .
                         परंतू त्यातही राजकारण्यांचे पक्षपात आणि अनाचाराचे प्रतिबिंब मात्र पडत गेले.हा अन्याय समाज वर्षानुवर्षांपासून सहन करीत आला आहे. आमदार, खासदारांच्या पेन्शन,सुविधा,भत्ते किंवा आणखी कोणत्याही लाभक्षेत्रात मात्र अशा सुधारणांचा कधी स्पर्शही होणार नाही याची दक्षता समाजाच्या या तारणहारांकडून तंतोतंत घेतली गेली.त्यासाठी सामाजिक लाभाच्या अनेक मुद्द्यांबाबत होणारे मतमतांतराचे पक्षिय राजकारण,गटबाजी अशावेळी त्यांच्या स्वार्थाच्याबाबतित  देशाच्या राजकारणात कधीही झालेली आढळली नाही.
               ह्या सुधारलेल्या चोरपावलांच्या समाजाच्या भावविश्वावर उमटलेल्या
खुणा वेळीच समजून घेऊन त्याची दखल घेतली गेली पाहिजे. अशीच अनागोंदी आणि प्रचंड पक्षपात वर्षानुवर्षांपासून भारतिय राजकारणात दिसत आहे. तरीही या अशा भाऊ दादांच्याच कर्तृत्वाचे अभिमान पोवाडे गाणाऱ्या विधायक विचारांच्या समाजातील चांगल्या लोकांचे प्रमाण येथे भरपूर आहे. या जुन्या नेभळट विचारांच्या परिनामाने...! ते कसेही असलेत तरी त्यांच्या मनाला सांभाळणारे...आणि त्यांना काही उलटून बोललो, त्यांचे मन दुखावले तर आपली पुढची कामं होणार नाहीत ही भिती समाजाच्या मनात कायम झालेली आहे.आपण बोललो तर समाजात आपली प्रतिमा आगाऊ म्हणून सिध्द होईल...म्हणून आपले काम भले आणि आपण भले, विनाकारणचे संबंध बिघडवणे नको, कुठे विरोध नको, म्हणून पुढे येण्याचं धाडस करणारांचे प्रमाण या समाजात नगण्य आहे.परंतू राखावी बहूतांची अंतरे या परिक्षेत आपण समाजातील स्वार्थी, खोट्यांसोबत कसेही वागलो तरी प्राविण्याने उत्तिर्ण होऊच शकत नाही.... हे सत्य अनेकांना कधी ओळखतात आलेले नाही.
                म्हणूनच जे कोणत्याही गोष्टीला भित नाहीत, कशाचीही तमा बाळगत नाहीत, कोणी काय म्हणेल, समाज काय समजेल याची पर्वा करण्याची त्यांना गरज वाटत नाही,लाज लज्जाही ठेवणे त्यांना बंधनकारक वाटत नाही....तशी तेवढी त्या त्यांनी बाळगली असती,तर महाराष्ट्रातील आघाडी सरकारला हादरा देणाऱ्या बंडखोरांनी जनतेच्या कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी करण्याची हिंमत झाली नसती. मग फाईव्ह स्टारच्या मौजमजेची संधीही मिळाली नसती. असाच माणूस आजच्या काळात लवकर आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊन यशस्वी होतो.राजकीय नेता होतो,सर्वाच्च पदावर पोहचतो. म्हणून तसेच सर्वांनी करावे अशी अपेक्षा नाही परंतू अशा प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी तोंड उघडणारा ची संख्या वाढावी हे समाजहित मात्र अपेक्षित आहे.... समाजाचं आणि दृष्कृत्त्यांच्या आघाताने अनेकांचं वैयक्तिक नुकसान करणाऱ्या अशा निगरगठ्ठांना आवरण्याकरीता, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी बोलणाऱ्यांच्या संघटीत शक्तीचा उठाव झाला पाहिजे.तिथे आपण अभिमानाने कुरवाळून ठेवलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या शस्त्रांचे  वापर झाले पाहिजेत.नाहीतर कोणतेही शस्त्र ठेऊन दिले,वापरले नाही तर त्याची धार बोथट होऊन ते निरूपयोगी होण्याचा धोका असतो,तो आपण लक्षात घेतला पाहिजे.....!  
                   मुळ मुद्द्यावर येऊन थोडक्यात सांगायचे म्हणजे नेमक्या बिघडलेल्या आजच्या परिस्थितीत विरोध करू नये, बोलू नये, कुणाचे मन दुखवू नये हे संस्कार मनावर पक्के बिंबवले गेलेले आहेत. त्यामुळे आपले कुठेतरी ईडीप्रमाणेच नुकसान होईल ही भिती डोक्यात ठेऊन वागणारा माणूस आयुष्यभर स्वत:चा विकास करू शकणार नाही. सामाजिक बदलासाठी पुरूषार्थाचं काही टक्के तरी योगदान देऊन आपल्या सामाजिक धर्माचेही पालन करू शकणार नाही.मग आयुष्यभर तात्पुरतं बाहेर आणि नंतर परिवारासोबत चार भिंतींच्या आत एवढंच सिमित त्याचं जीवन असावं का? कुणाला बोलू नये, विरोध करू नये, या फुटपट्टीने सतत मोजमाप करून जगणाऱ्यांचे अमाप पिक असल्याने सामाजिक, राजकीय आणि व्यवहारीक जगतातील अनागोंदीचा भस्मासूर जबरदस्त प्रमाणात वाढला आहे. बळी तो कानपिळी न्यायाने त्या अजस्त्र अजगाराने या देशातील समाज,लोकशाही,संविधानाला गिळण्याची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही मात्र फक्त त्या लोकशाही आणि संविधानाचे डांगोरे पिटून ते आम्हाला मिळाले म्हणून स्वतःला नुसतं भाग्यवान समजतो.यात या देशातील सुशिक्षित,उच्चशिक्षितांचंही प्रमाण प्रचंड असणं हा लोकशाहीचा सुर्य मावळण्याचा धोका म्हणजे स्वातंत्र्याचं उघड्या डोळ्यांनी पाहिलं जाणारं दुर्दैव आहे... स्थितप्रज्ञ संन्याशाप्रमाणे आम्ही त्या लोकशाही व संविधानाच्या  बहूमोल  उपहारांचे लाभ न घेता, स्पर्श आणि काल्पनिक अनुभूतींनीच तृप्तीचे ढेकर देत आहोत.
                 एकवेळ उपाशी राहिलोत तरी चालेल परंतू खोटा धर्मवाद,बेगडी राष्ट्रवाद आणि उन्मादी आरोळ्या हाच आमचा अभिमान आहे....! त्या संमोहनातच आम्ही येथेच्छ आनंदी आहोत....! त्यात आम्हाला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आम्हाला पोकळ अभिमान आहेच. त्याचा वापर कुठे बोलण्याची, कोणाविरूध्द भुमिका घेण्याची हिंमत आमच्यात नसली तरी आम्ही अन्याय सहन करून अनाचाऱ्यांसमोर नांग्या टाकणारे ५६ इंची असल्याचं मोठेपणच आम्हाला भरपूर  आहे..!
                   इंग्रज गेले आणि आम्ही स्वतंत्र झालो असे आम्ही म्हणतो.परंतू अजूनही आपण विघातक विचारसरणीच्या लोकांच्या किती गुलामगीरीत आहोत याचा विचार करण्यासारखी चिंतनिय परिस्थिती कायम आहे. ती आपल्या न बोलण्याच्या, वाईटपणा न घेण्याच्या, कुणाचेही मन न दुखविण्याचे धाडस नसणाऱ्या नेभळट विचारांमुळे निर्माण झाली हेच समाजावरील भयंकर संकट आहे. म्हणून‌ ही जुणी फुटपट्टी सोडून कोषाच्या बाहेर यावं लागेल.हे मोजमापं फक्त सज्जन,सदाचारी,सेवाभावी व विधायक विचारांच्या मानवतावादी माणसांसाठी लागू आहेत. तिचा उपयोग कुठेही करून देशातील विघातक अनाचारी,भ्रष्टाचारी राजकारणी,धर्माचे हरामी, ढोंगी ठेकेदार, सेवेचा बुरखा पांघरून समाजाच्या लुटमारीचे काळे कारनामे करणारे राजकारण आणि प्रशासन व सेवा क्षेत्रातील पांढऱ्या वेषातील चोर, दरोडेखोर, गुंड, मवाली, समाजावर आघात करणाऱ्या दुराचाऱ्यांच्या बाबतित नाही, ही खुणगाठ मनाशी बांधली पाहिजे. आपण कुणाचेही मन दुखवू नये, विरोध करू नये, कुणाच्या मध्ये बोलत बसू नये, कुणावर संकट असेल तर तिथेही बोलू नये.... या वैचारिक दारिद्र्याचे धडे घेऊन वागायला लागलो तर बुडालो...रसातळाला गेलोच म्हणून समजा.... मानवी समाज आणि आपण स्वतः पण....!
संजय एम. देशमुख, 
जेष्ठ पत्रकार मोबा.९८८१३०४५४६ 

    Post Views:  339


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व