नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली.!; ब्रम्हपुरी नगर परिषदेचा प्रताप
मागिल तीन वर्षांपासून नाली उपसली नसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात.!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Jun 2022, 10:53 AM
(गुलाब ठाकरे) चंद्रपूर : ब्रम्हपुरी ज्ञानेश्वर नगर येथील नागरिकांनी वारंवार नगरपरिषद ब्रम्हपुरीला निवेदने देऊन सुद्धा गेल्या तीन वर्षापासून नालीचा उपसा न केल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ज्ञानेश्वर नगर येथील वडसा रोड लगत असलेली नाली मागील तीन वर्षांपासून उपसा करण्यात आलेली नसून सदर नालीला बाजार चौका लगत असलेल्या तलावाचे दुषित पाणी वारंवार सोडण्यात येते तसेच पावसाचे पाणी नालीचा उपसा न केल्यामुळे शेजारी असलेल्या खाली भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहत असल्यामुळे डम्प झालेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे ब्रह्मपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत नालीचा उपसा करण्यात यावा असा विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आले.
निवेदनात या अगोदर सुद्धा मुख्याधिकारी यांना वारंवार विनंती अर्ज केलेले आहे मात्र त्यावर अध्यापही कोणतीही उपाययोजना नगरपरिषद स्तरावरून करण्यात आलेली नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात साप , विंचू सारखे किडे विषारी प्राणी रस्त्यावर , घरात प्रवेश करतात त्यांचा येथील आजूबाजूला राहात असलेल्या नागरिकांना नेहमी धोका असतो . असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक पावसाच्या सुरुवातीला शहरातील सर्व नाल्या गटारे साफ करणे ही नगर परिषदेची जवाबदारी असते. मात्र दर वर्षीच्या तुलनेत नाली उपसा करणाऱ्या कामगारांची संख्या ५० वरून कमी करत ३० कामगार सध्यास्थितीत नाली उपसा करतात त्यामुळे जे ५० कामगारांना नाली उपसणे शक्य नव्हते ते ३० कामगार कसे काय करणार हा सर्वसामान्य नागरिकांना समजण्यासारखा विषय आहे. ब्रह्मपुरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळे शहरात विकास कामातही वाढ झालेली असून नालीचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा दीडपट झालेली आहे.
आणि त्यामुळे पुर्वी असलेल्या ५० कामगाराच्या तुलनेने ८० ते ९० कामगाराची गरज असताना मुख्याधिकारी यांनी ५० कामगारांवरून अवघे ३० कामगार कामावर ठेवल्याने शहरांमध्ये अस्वच्छतेचा पसार माजलेला आहे आणि असे असताना सुद्धा राजकीय पाठबळाच्या जोरावर वरच्या पातळीवर स्वच्छ सुंदर ब्रम्हपुरीचा बागुलबुवा करुन शहराला स्वच्छतेचा नामांकन प्राप्त करून घेतल्या जातो याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरामध्ये विकास कामे करायची असून स्वच्छतेचे काम असो पाण्याच्या संबंधित काम असो किंवा विजेच्या संबंधित काम असो ही सर्व कामे शहरातील नागरिकांनी दिलेल्या कराच्या पैशामधून केली जातात आणि त्यामुळे शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ही नगरपरिषदेची जवाबदारी आहे मात्र येथील प्रशासनाला शहरातील नागरिकांच्या समस्यांची काही लेने देणे नसून फक्त कर वसुली करीता व्याजाच्या टक्क्याने टक्का जोडून कर वसुली केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाबाबत फार मोठा आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
Post Views: 177