काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, काँग्रेस नेते नसीम खान यांचं मोठं वक्तव्य


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  21 Jun 2022, 9:06 AM
   

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ महाविकास आघाडीला विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवादर चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यामुळे आता  काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विधान परिषदेच्या पराभवानंतर मविआमधील मतभेद समोर येत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आता सरकारमध्ये राहायला पाहिजे का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले  नसीम खान?

चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार काँग्रेसकडून देण्यात आले होते. पहिल्या पसंतीचा उमेदवार पडतो, ही  आत्मचिंतनाची बाब आहे. आता सरकारमध्ये राहायला पाहिजे का, याचा विचार करण्याची गरज आहे. पुढे काय करायचं यावर विस्तृत विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज आहे. कोणती मतं कुठे गेली, हे सांगणं योग्य नाही. पण मतं फुटली आहेत. फ्लोअर मॅनेजमेंटची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्याच्यावरच आता सवाल उपस्थित झाले आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात काँग्रेसही होते. या प्रोग्राममध्ये प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्यासाठी स्पेस देण्यात आली होती. आमदारांची नाराजी आहे. बैठक होईल. चर्चा होईल. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, अद्याप सत्तेतून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पण सध्या  जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर काही ना काही तरी निर्णय घ्यावा लागणार असल्याचे नसीम खान यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत काँग्रेसला धक्का

दहा जागांसाठी विधानपरिषद निवडणूक झाली. या निवडणुकीत संख्याबळानुसार राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रत्येकी दोन तर भाजपाचे चार उमेदवार निवडून येणे अपेक्षित होते. मात्र भाजपाने महाविकास आघाडीला धक्का देत आपला पाचवा उमेदवार देखील निवडून आणला. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे महाविकास आघाडीमध्ये आणखी दुरावा निर्माण झाला असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

    Post Views:  160


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व