ग्रामगीता महाविद्यालयात पालक व माजी विद्यार्थी सभा


 संजय देशमुख  07 Apr 2022, 8:44 AM
   

चिमूर: ग्रामगीता महाविद्यालयात पालक व माजी विद्यार्थी सभा शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी जसे महत्त्वाचे असतात, तेवढेच पालक सुद्धा महत्वस्थानी असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात शाळा-महाविद्यालयासोबतच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात. पालक आणि शिक्षक या दोघांच्या महत्प्रयासाने विद्यार्थी घडत असतो, या सर्व बाबींना लक्षात घेऊन ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे पालक व माजी विद्यार्थी यांच्या सयुंक्त सभेचे आयोजन दि. ०४/०४/२०२२ रोजी सोमवारला करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी, नॅक समिती समन्वयक प्रा. हुमेश्वर आनंदे पालक प्रतिनिधी म्हणून श्री. तिलकजी बांगडे, गणेशजी मडकाम, माजी विद्यार्थी प्रतिनिधी सचिन भरडे, जयराम वावरे मंचावर उपस्थित होते.
 ग्रामगीता महाविद्यालयात गेल्या ५ वर्षात झालेले सकारात्मक बदल सर्वांच्या लक्षात येत होते. पालक प्रतिनिधी म्हणून बोलत असताना मा. तिलकजी बांगडे यांनी महाविद्यालयात अनेक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असून विद्यार्थी समाधानी आहेत असे मत व्यक्त केले तर मा. गणेश मडकाम यांनी महाविद्यालयाच्या झालेल्या प्रगतीसोबतच विद्यार्थी सुद्धा स्वत:चा विकास करून घेतील अशी आशा व्यक्त केली. या शिवाय सभेत श्री. बाबा ठावरी ,श्री. मनोज गजभिये यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या प्रशासनास शुभेच्छा दिल्या.
या सभेमध्ये माजी विद्यार्थी सचिन भरडे यांनी महाविद्यालयात बहुतांशी सोयी उपलब्ध झालेल्या असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कला गुणांना वाव मिळण्यासाठी ऑडीटोरियमची निर्मिती करण्यात यावी अशी सभेत आग्रहाची मागणी लावून धरली, तर माजी विद्यार्थी जयराम वावरे यांनी सुद्धा अलीकडील झालेल्या विकासात्मक कामाची प्रशंसा करत या महाविद्यालायचा विद्यार्थी म्हणून मला अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या शिवाय सुरज देशकर, स्वरूप बडगे, शुभम झगडकर, कु. मयुरी देवतळे यांनी सुद्धा महाविद्यालयात झालेल्या सुधारणा व सोयीसुविधाबाबत समाधानकारक मनोगत व्यक्त केले. 
या सभेला अध्यक्ष म्हणून संबोधन करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी महाविद्यालयाची भूमिका मांडताना, पालक व माजी विद्यार्थी यांनी सुचविलेल्या सूचनांचे स्वागत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले. 
सभेच्या शेवटी पालक व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन सभेची सांगता करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचालन पालक –शिक्षक समिती समन्वयक प्रा. संदिप मेश्राम, प्रास्ताविकपर मार्गदर्शन नॅक समिती समन्वयक प्रा. हुमेश्वर आनंदे तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी समिती समन्वयक प्रा. नागेश ढोरे यांनी केले. सभेला बहुसंख्येने पालक, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

    Post Views:  181


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व