ना.बच्चू कडू यांच्या विरोधात राज्यपालांना भेटणार
ॲड.प्रकाश आंबेडकर;डीपीसी निधी अपहार केल्याचा आरोप
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी ‘डीपीसी’चा निधी वळवून निधीचा अपहार केला, हे जिल्हा न्यायालयाने सकृतदर्शनी मान्य केले आहे. परंतु या विषयी कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी कोर्टाला राज्यपाल यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील आठवड्यात राज्यपाल यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) रस्त्यांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेने मंजुर केलेल्या रस्त्यांना निधी न देता अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी दिला होता. त्याविरोधात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची सुद्धा भेट घेण्यात आली. या प्रकरणी पोलिस कारवाई करण्यास तयार नसल्याने वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश जी.डी. पाटील यांच्या न्यायालयाने निधी वळता प्रकरणी घोटाळा झाल्याचे सकृतदर्शनी मान्य केले आहे. परंतु या विषयी पुढील कायदेशिर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक असल्याने न्यायालयाने ९० दिवसांचा वेळ दिला आहे. राज्यपालांनी परवानगी दिल्यास पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर प्रकरणी वंचितच्या वतीने पुढील आठवड्यात राज्यपाल कोश्यारी यांची मुंबई भेट घेण्यात येईल, असे ॲड. आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला ॲड. आशीष देशमुख, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे व इतरांची उपस्थिती होती.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना बजावणार नोटीस
निधी वळता प्रकरणी घोटाळा झाल्याचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर हे पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर सुद्धा पोलिस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास सहमती दर्शवली नाही. त्यामुळे स्वतः ॲड. आंबेडकर पोलिस अधीक्षकांसोबत बोलले व या विषयी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना सुद्धा पोलिस अधीक्षकांनी टाळाटाळ केल्यामुळे त्यांना सुद्धा कायदेशिर नोटीस बजावण्यात येईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
Post Views: 475