नवाब मलिकांच्या मागील ईडीला सुडाच्या दबावतंत्राचा गंध !


 संजय देशमुख  25 Feb 2022, 9:21 PM
   

या भारतभुमीमध्ये मानवी जीवनमुल्ये शिकविणार्‍या संतांनी जीवनातील आदर्शांना अधोरेखित करून मानवाची वाटचाल कशी असावी त्याचा समाजधर्म, आणि त्याला अनुसरून राजांचा आणि जबाबदार सामाजिक पुरूषांचा राजधर्म काय असावा,याबाबत मानवी धर्माचे काही संकेत सांगीतलेले आहेत.ही तत्वे सामाजिक, राजकीय आणि त्यांची छबी असणार्‍या प्रत्येक क्षेत्रात मानवी कर्तव्य म्हणून पाळली जावीत हिच धर्मशास्त्रांची शिकवण आहे.
 अमानवीय, उन्मादी दृष्ट विचार आणि सुडांच्या अतिरेकी दुर्भावनांनी मानवी समाजाचे वाटोळे होऊन सामाजिक अधोगती झाल्याची अनेक आहेत. ती रामायण महाभारताने समाजासमोर आणलेली आहेत. दुर्भावनांमधून उफाळणारी सुडबुद्धी काय करू शकते, गोतास काळ कशी ठरू शकते या प्रवृत्तीची एक बोधकथा बरेच काही शिकवून जाते... ती विहिरीत प्रवेशलेल्या अजस्त्र अजगर आणि तेथील बेडकांच्या गोतावळ्याची....! वर्चस्वाच्या लढाईत आपल्या इतर भाऊबंदांना संपविण्यासाठी एक बेंडूक एका अजगराला आपल्या विहीरीमध्ये येण्यासाठी पाचारण करते. त्याला वाटते सर्वजणांना अजगराने गिळल्यावर संबंध विहीरीत माझेच साम्राज्य राहील. म्हणून तो अजगराच्या समोर टूणूक टूणूक उड्या मारत कपारीत इकडे तिकडे दडलेल्या आपल्याच भावबंद बेंडकांच्या दिशा त्या अजगराला दाखविण्याचे दुष्कर्म करीत राहतो... आणि अनर्थकारी परिणाम काय होत असतो, हे शेवटी त्यालाही त्या अजगराच्या पोटात जाऊन बसल्यानंतरच कळते. 
                       अशा अजस्त्र अजगराप्रमाणे आपली पाळेमुळे सध्याच्या राजकारण्यांनी या देशात पसरविलेली आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टाने या स्वतंत्र भारतात प्रस्थापित झालेली लोकशाही संपून जाते की काय अशी भिती आता सर्व सामान्यांनाही वाटू लागली आहे. संविधान आणि घटनेची मोडतोड करून जो मध्ये येईल त्याचे अस्तित्व संपवून त्याला गारद करायचे, शरणागतीला आणून सोडायचे, अशा अघोरी महत्वाकांक्षेची सुडाची वाटचाल सध्याच्या भारतीय राजकारणात सुरू झालेली आहे. त्यासाठी सर्व संस्थांना हातातले बाहूले बनवून त्यांना आपल्या इशार्‍यांवर सोईच्या ठिकाणी आक्रमणाचे ईशारे देण्याचे काम सुरू झाल्याचे देशाला  दिसत आहे. यामुळे अनेक अंध भक्तांवरील संमोहनाचा प्रभावही हळू हळू कमी होत जावा, अशाप्रकारे घड्याळाचे काटेच आता उलट्या दिशेला फिरतील की काय अशी परिस्थिती दिसते आहे. अशा मनामनातील जनअपेक्षांच्या  निर्णायक अवस्थेची चाहूल लागत आहे. 
              आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे सतत बोलत राहणारे प्रवक्ते नवाब मलिक यांचेवर अखेर ईडीची अवकृपा झाली, आणि केंद्र सरकारच्या इशार्‍यांवर ‘ईडी मिळी गुपचळी’ "ठेऊन राजा बोले सरदार हाले" म्हणून काम करणारी ईडी ते एकदिवस करणार होतीच हे सुद्धा अगोदरच स्पष्ट झालेले होते. कारण भाजपनेत्यांच्या हालचाली, आणि त्यांच्या उन्मादी भविष्यवाण्यांमधून आता कोणा-कोणाचा नंबर लागणार, आणि कोणा कोणाला जेलमध्ये पाठविणार हे अधिकारवाणीने सांगणे सुरू राहते. अगोदरच रतनखत्रींच्या आकड्यांप्रमाणे जलदगतीने स्पष्ट होऊ लागते, एवढे अमर्याद अधिकार देशाच्या ईतिहासात कोणत्याही सरकारमधील वाचाळवीरांना प्राप्त झाले नव्हते. तो महाप्रसाद मोदी नरेशांच्या चरणापासी विलीन झालेल्या त्यांच्या सेवेतील सेवेकर्‍यांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कुणाला ठेवायचे कुणाला संपवायचे, कोणाला जेलमध्ये झोपवायचे, तर शरण आलेल्या कोणत्या मंडूकांना ऐश्वर्यात लोळवायचे याचे नियोजन या चौकडीकडेच सोपवलेले असते. एकामागे ओरडणारे  पळवून आणलेले कोंबडे पाहिजे तेव्हा चोरासारखे गप्प बसवून‌ अचानक ओरडायला कसे सोडायचे,  हे सगळे नियोजित वेळापत्रक सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाच्या सत्ताधार्‍यांना जमलेले नाही. कारण आजपर्यंत आलेले राज्यकर्ते हे कदाचित मानवी जीवनमुल्य आणि संस्कारांचा स्पर्शाने अंकित झालेले विधायक विचारांचे सत्ताधानी असावेत!
              ‌‌ सध्या देशाच्या राजकारणात प्रजेच्या कल्याणाच्या योजनांमध्ये एक दक्ष राजा आणि जबाबदार नवरत्न दरबार म्हणून लक्ष घालण्याऐवजी स्वत:चे अस्तित्व अबाधित राखून फक्त राजसिंहासनाला बळकट करण्याचे शलकपटी राजकारण तेवढे सुरू आहे.लोकशाहीमध्ये निकोप राजकारण करून देशाच्या विकासप्रक्रीयेत  विरोधकांच्याही मतांचा आदर करण्याचे औदार्य दाखवावे लागते.हा त्यांना सोबत घेऊन चालण्याचा विधायक वारसा केव्हाचाच संपविण्यात आला आहे,आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवता आली नाही म्हणून हे राज्य सरकारपाडू मिशनच्या रडारवर  प्राधान्न्याने आहे.त्यामुळे राष्ट्रीयविकासाला नुकसान पोहचविणाऱ्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या विरोधकांना मुळासकट संपविण्याचे अघोरी आक्रमणं करणे एवढाच एककलमी कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये मानवता ,सामाजिकता हरविलेले कलाकार नेते सध्या सक्रीय आहेत.त्या महत्वाकांक्षेतूनच  राष्ट्रविकासाला पुरक अशा दुरदर्शित्वातून कष्टाने निर्माण केलेल्या संविधानावर आघात करण्याची विनाशी वाटचाल सुरू आहे.
आज याला अटक होणार,उद्या त्याला अटक होणार,ईडीचे पाहूणे कुठे दाखल होणार याची खडान् खडा माहिती  काव काव करून प्रसारीत करणाऱ्या कावळ्यांना  अगोदरच कशी मिळते? काय ती अंर्तज्ञानाने जाणून आपल्या भक्तांपर्यत पोहचविणाऱ्या  तरबेज भविष्यवेत्त्या पोपटांची एक फौजच भाजपामध्ये आणि आजकाल निर्माण झाली आहे काय ? म्हणूनच त्या तिलिट कंपूच्या आचार्यांना ईडीच्या वक्रदृष्टीच्या रडारवर आता कोणाचा नंबर लागणार म्हणून विचारण्यात आले होते. आमच्यामध्ये बोलू नका,जो मध्ये  आला त्याला ईडीने संपविला म्हणून समजा. असा उघड दबदबा निर्माण करून ज्या देशामध्ये विरोधकांचे,सामाजिक नेत्यांचे  आवाज दाबल्या जातात, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जाते, त्या देशाची लोकशाही संपून अराजकतेकडे सुरू झालेली वाटचाल समजावी...!
मालमत्तेच्या प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने तत्परतेने ताब्यात घेतले आणि चौकशी करून एका दिवसातच अटक करून तातडीने कोठडीतही घातले .असे प्रकार पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशात इंग्रज सरकार करत होते.त्यांचाच वसा लोकशाही आणि संविधानाची गोंडस बकवासबाजी करणाऱ्या जुलमी भाजपने घेतलेला आहे.नवाब मलिकांचे मालमत्ता प्रकरण आहे.त्यात ते खरोखरच गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा ही होईलच.परंतू बहूतेकवेळा मालमत्ता खरेदी करणाराचा काही दोष नसतो,आणि त्यात त्याला बेमालूपणे फसविले गेलेलेही असू शकते.असेच मलिकांचे वकीलही बोललेले आहेत.त्याचा निवाडा न्यायालयात होईलच.परंतू अशा कारवाया करण्यास मोहिमेवर निघालेल्या सरदारांचे घोडे पुढे जाण्यापूर्वीच त्यांची खोगीरंच जादुई गतीने कशी काय उडत असतात, हे या देशातलं पूर्वी कधीही न घडलेलं एक मोठं आश्चर्य आहे.त्यांची स्वप्ननगरीची सैर आणि त्यानंतर लगेच स्वप्नपूर्तीची आनंदप्राप्ती ही   हिमालयातून ढोंगी,कपटी  साधना करून आलेल्या बिलंदर स्वामीच्या कृपादृष्टीनेच फक्त घडू शकते. परंतू ईथे ती प्रत्यक्षात घडत आहे,म्हणून ती खरोखरच सत्त्य आहे का हे चिमटा घेऊन पाहण्याची वेळ आलेली आहे. 
देशाच्या राजकारणात फक्त विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीच भ्रष्ट्राचारी आहेत आणि सत्तेत बसलेले सगळे लोकप्रतिनिधी हे धुतल्या तांदळाचे अत्यंत प्रामाणिक निपजलेले आहेत, असा देश जगात शोधून सापडणार नाही.मात्र तो फक्त भारत आहे म्हणून अनेक अवार्ड पटकविणाऱ्या भारताला याबाबतितही गौरवांकीत करणारा बहूमान मिळून तो या विषयातही विश्वगुरूच ठरला पाहिजे, असे देशातील संवेदनशील नागरीकांना वाटत असेल तर त्यात काही वावगे वाटून घेण्याची गरज नाही.
काही का असेना पण ईडीच्या धुमधडाक्यात कारवाया आणि विरोधकांना व पत्रकारांनाही संपविण्याचे सत्र हा या देशात कोरोनाच्याही अगोदर येऊन ठेपलेला विनाशकारी धोका ठरलेला आहे.म्हणूनच नबाव मलिकांच्या मागील ईडीला सुडाच्या दबावतंत्राचा गंध मात्र येतो आहे.त्यामुळेच या वादग्रस्त कोरोनाचे  निवारण कसे करायचे हा येथील लोकशाही आणि संविधानासमोरील यक्ष प्रश्न आहे!

    Post Views:  211


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व