विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?


पेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुटण्याची शक्यता
 संजय देशमुख  16 Feb 2022, 8:01 PM
   

मुंबई  : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक  ही आवाजी पद्धतीने व्हावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे सभागृहात आवाजी पद्धतीने मतदान होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यपालांनी त्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात लेटरवॉर बघायला मिळालं होतं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अखेर निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. पण त्यावर राज्यपाल काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभेचा अध्यक्षपदाचा पेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुटण्याची शक्यता आहे. कारण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अवगत केलं जाईल. राज्यपालांना तारीख सांगितली जाईल, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्याआधी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार असल्याची चर्चा आहे. पण त्यासाठी राज्यपालांची मंजुरी असणं आवश्यक आहे. दुसरीकडे राज्य सरकारने भाजपच्या 12 निलंबित आमदाराचं निलंबन रद्द केलं तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपाल संमती देऊ शकतात, अशीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

    Post Views:  178


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व