मित्रांनो हे शिर्षक विचित्रच वाटते ना ! तसं काय बी नाई, अधिक अनं बरोबरच्या चिन्हामुळे जरा गोंधळ उडण्याची शक्यता हाय.माये पत्रकार दोस्तबी म्हणतीन. हा कोनता फंटारा आनला बे ! आता हा फंटारा शब्द बी आमच्या आदरणीय दिवंगत संपादक साहेबांचा आवडीचा होता. आपल्याजवळ नीरा गोठडीच भरेल हायना ! सर्वांचे लाडके अकोल्यातले व्यंगचित्रकार याईचं शिनमाबद्दल हटकेच तत्वज्ञान हाय. ते हाय बी अगदी करेक्ट! मलेच काय तुमालेबी खरं वाटन. या जगात शिनमा टाकीजशिवा कोनतच पवित्र मंदीर नाई.असं मले तरी वाट्टे.तुमचा विरोध अशीन तं काई हरकत नाई. प्रत्येक धर्माच्या मानसात आपल्या धरमाबद्दल अतिशय कट्टरता अनं प्रेम-आस्था रायतचे ना. कोनी कोनाच्या ठिकानी धुडगुस घातला तं जमतच नाईना.

नीरा एकमेकाचे डोये वटारनं सुरु होते. पन इथं तसं काय बी नाई. माणूस घाम गाळून दोन पैसे कमाई करुन दोन घटका मनोरंजन कराले थेटरात पैसे खर्चून जाते. एकडाव टाकीजात बसला की एकमेकाचं तोंड बी पाह्यत नाई, पन शिनमाचा लय आनंद घेतात. समोरच्या पांढ-या परद्यावर अख्या जगात रंगांची उधळण चालली असते. पांढरा परदा मंदीर मस्जीद , चर्च, गुरुद्वारा , राग, द्वेष, उत्कट प्रेम, बदला, मानवी भावनेचे सर्व रंगच दाखोते, सतत 3 तास अनं आपल्या अंगावर एकही रंगाची छटा उमटू देत नाही. पुन्हा जसाच्या तसा. अगदी निर्विकार. प्रेक्षक मात्र प्रेम, द्वेष, कटूता सर्व आपल्या डोकस्यात घेऊन निघतो. थेटरात असतांना जातपात धर्म सगळं विसरुन अगदी मनमुराद आनंद घेतात. अनं बाहीर आल्यावर ख-या जगात पुन्हा जातीपातीचं खरं नाटक करतात. आपले कामं करतात. कोनं कितीही सर्व धर्म समभावाच्या पुंग्या वाजोल्या तरी तो राहतो फक्त टाकीजच्या अंधारातच अनं बाहेर उरतो तो फक्त ईलेक्शनपुरता. अमर, अकबर, अँथोनी पुन्हा आपल्याच वाटेवर.....
अंबादास तल्हार, जेष्ठ पत्रकार, अकोला
Post Views: 323