दिव्यांग प्रमाणपत्रावरून पालकमंत्री आक्रमक
जीएमसीच्या अधिष्ठातांना सुनावले खडेबोल;जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा
अकोला - स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दिव्यांग बोर्डातून दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दिव्यांगाना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर अडचण अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी अद्याप न सोडवल्याने त्यांना पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सुनावले. आपल्याकडून काम होत नसेल तर सुटीवर जा असा सल्ला सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी यावेळी अधिष्ठातांना दिला.
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिव्यांग कल्याण व स्वयंरोजगार संबंधीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी ग्रामीण भागातील दिव्यांग सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे त्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बैठकीत केले. यावेळी त्यांनी दिव्यांगांची स्थिती, संख्या, लिंग, त्यांना शासनामार्फत मिळत असलेल्या सुविधा व गरजूंना अद्याप न मिळालेल्या लाभासंदर्भात माहिती दिली. त्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी सूचना मांडल्या व दिव्यांग कल्याणासाठी जिल्ह्यात महत्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सदर बैठक पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
अस्थिव्यंग विभागात फक्त एकच डॉक्टर
दिव्यांग कल्याण आढावा बैठकीत एका दिव्यांगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विलंब लागत असल्याची तक्रार केली. अस्थिव्यंग विभागात दिव्यांगांच्या तपासण्यासाठी एकच डॉक्टर असल्याने प्रमाणपत्रांसाठी महिनाभर थांबावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच बेराटेक्नीशियन नसल्याने सुद्धा विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. तसेच अधिष्ठाता पदाची जबाबदारी त्या योग्यरित्या पार पाडू शकत नसतील तर रजेवर जाण्यास सांगितले.
शिवजयंतीदिनी दिव्यांग कल्याण भवनाचे उदघाटन
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अडचणींचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी जिल्ह्यात तात्पुरते दिव्यांग कल्याण भवन उभारण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन शिवजयंती अर्थात १९ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल, तर स्थायी भवनासाठी एक कोटी रुपये देण्यात येईल, अशी घोषणा या बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली. त्यासोबतच प्रत्येक तालुक्यात एका शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती दिव्यांगांच्या अडचणी सोडण्यासाठी करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी बैठकीत दिले.दिव्यांगांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका व जिल्ह्यात ३२ दिव्यांग गट स्थापन करण्यासाठी यंत्रणांना काम करावे असे सुद्धा पालकमंत्री यावेळी म्हणाले.
Post Views: 306