ऑपरेशन उडाण अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती


अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सायबर सेलचा संयुक्त उपक्रम*
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2026, 10:17 AM
   

अकोला: पोलीस अधीक्षक अर्चित चांडक  व अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी,तथा  उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन उडान अंतर्गत वाढते सायबर गुन्हे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अकोला आणि सायबर सेल, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ललित ट्युटोरियल आणि एल.आर.टी. कॉलेज (LRT College) येथे भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला दोन्ही संस्थांमधील सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शहर वाहतूक शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (PSI) इकबाल शेख आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवींद्र उगवेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. दुचाकी चालवताना हेलमेटचा वापर करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, आणि ट्रिपल सीट न बसणे यासारख्या मूलभूत नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणारे नुकसान आणि कायदेशीर कारवाई याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे धडे

दुसऱ्या सत्रात सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मनीषा तायडे, गोपाल मुकुंदे आणि आशिष आमले यांनी उपस्थित तरुणांना सायबर सुरक्षेचे धडे दिले. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा, ऑनलाईन आर्थिक फसवणूक (Online Fraud), बँक फ्रॉड आणि हनीट्रॅप सारख्या गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि आपला ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जर कोणाची सायबर फसवणूक झालीच, तर तात्काळ सायबर हेल्पलाइन किंवा सायबर सेलशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिरामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त आणि सायबर गुन्ह्यांबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली. कॉलेज प्रशासनाने पोलीस दलाच्या या स्तुत्य उपक्रमाचे आभार मानले.

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व