प्रेरणा आधारवडाची सावली; सतीश देशमुख वेणीकोठेकर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2026, 9:57 AM
   

दीडशे वर्षाची परंपरा असलेले  जी.प.आगरकर कनिष्ठ महाविद्यालय अकोला म्हणजे आमच्याआयुष्याच्या प्रवासातील महत्त्वाचे स्टेशन. दीडशे वर्षापेक्षा जास्त शैक्षणिक परंपरा असलेल्या या ऐतिहासिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सतीश देशमुख वेणीकोठेकर, एक फक्त शिक्षकच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांची शोध घेणारी चालती फिरती वेधशाळा म्हणजे प्राचार्य सतीश देशमुख वेणीकोठेकर सर त्यांच्या एकसष्ठी निमित्त थोडेसे......* 
1999-2000 चा काळ.त्यावेळी  मोबाईल, इंटरनेट,सोशल मीडिया, अशा जगाशी जोडणाऱ्या साधनांची ग्रामीण भागात सुरुवात झालेली नव्हती. परंतु जगात बदलाचे वारे वाहत होते. तरी गावकुसातील जीवनमान पारंपारिक चौकटीतच अडकून होते... अशातच 1998-1999 मध्ये माझ्यासारख्या असंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दहावी पास झाल्यानंतर पुढील शैक्षणिक जडणघडणीसाठी शहराशी, बदलत्या जगाशी जोडण्याची सुरुवात झाली होती. परंतु ग्रामीण जिल्हा परिषद शाळांमधून शिकून आलेल्या माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना कॉन्व्हेन्ट म्हणजे काय ,इंग्रजी माध्यम म्हणजे काय,शहरातील महाविद्यालयीन वातावरण कसे असते याची पुसटसी कल्पनाही नव्हती... आमच्यापैकी अनेकांची बालपण आणि शालेय शिक्षण दिव्याच्या टीम-टीमत्या प्रकाशात अभ्यास करत गेलेली होती. ग्रामीण जीवनशैली,शेती,मोलमजुरी, घरची परिस्थिती आणि त्याचबरोबर शिक्षणाची जिद्द या सगळ्यांच्या संगमातून धैर्य घेऊन असंख्य ग्रामीण विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशासाठी शहरात येऊ लागले.कधीकाळी वर्षातून एखाद्या वेळी आई-वडिलांसोबत पाटी-पुस्तक घ्यायला, शाळेचा ड्रेस घ्यायला शहरात येत होतो त्याच शहरात आता महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज जायचे होते. त्या प्रवासात आनंद होता,कुतूहुल होते, उत्सुकता होती,त्याचबरोबर आई-वडिलांच्या आणि स्वतःच्या स्वप्नांची उमेद डोळ्यात घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी सुध्दा होती. गावकुसातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शहरात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणे म्हणजे हे एका पूर्णपणे नव्या जगात प्रवेश करण्यासारखे होते तो  काळ आमच्यासाठी केवळ नवीन शैक्षणिक वर्ष नव्हत तर तो बदलत्या युगाची चाहूल देणारा आणि स्वतःला नव्या  वातावरणात सिद्ध करण्याचे आव्हान घेऊन आलेला काळ होता... त्याकाळी महाराष्ट्रातील अकोला शहर  आपला ऐतिहासिक वारसा जपणारे शहर एवढीओळख होती. त्याकाळी शहरीकरणाच्या दृष्टीने अकोला शहर तुलनेने छोटे होते.  अकोला शहराची व्याप्ती त्यावेळी तुलनेने कमी होती. अकोला महानगरपालिका तेव्हा अस्तित्वात नव्हती तरीदेखील आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अकोला शहर हे स्वप्ननगरीपेक्षा कमी नव्हते.
पुढे महाविद्यालयीन प्रवास सुरू झाला अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली शहरात बरेच महाविद्यालय असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पसंती जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये. प्रवेश घेण्यावर असायची मी आणि माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयात अकोला  येथे प्रवेश घेतला. दीडशे वर्षापेक्षा जास्तची शैक्षणिक परंपरा लाभलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे हे ज्ञानमंदिर गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महान विचारवंतांच्या शैक्षणिक प्रवासाशी जोडलेला वारसा आहे. अशा ऐतिहासिक परंपरेच्या ज्ञान मंदिरात शिकण्याची संधी आम्हाला मिळाली. ग्रामीण जिल्हा परिषद शाळेतून शिकून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षण हा टप्पा खरोखरच मोठा बदल असतो ... परंतु  आगरकर कनिष्ठ महाविद्यालयातील वातावरण ग्रामीण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते जसे आपुलकीचे असते तसेच आपलेपण आम्हाला आगरकर महाविद्यालयातही अनुभवाला मिळाले. महाविद्यालयीन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थी नाते फक्त तासिका आणि विषयापूरते मर्यादित असते असे तिथे कधीच भासले नाही.येथील शिक्षकांनी केवळ आम्हाला शिकवलं नाही तर आम्हाला घडवण्याचे कार्य केले आणि या शिक्षकांमध्ये एक नाव प्रकर्षाने मनात कोरले गेले ते म्हणजे प्रा. सतीश देशमुख सर ....!
 अकरावी बारावीचे वय म्हणजे आयुष्याच्या जडणघडणीतील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा याच वयात आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळू शकते,याच वयात घेतलेले निर्णय आयुष्याची वाट बदलू किंवा बिघडवू शकतात.मन अत्यंत संवेदनशील असते, नव्या जगाचे आकर्षण असते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू झालेली असते.त्या वयात मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल आकर्षण वाटते,मैत्रीची नाती निर्माण होणे,भावनिक चढ-उतार अनुभवणे ही त्या वयातील स्वाभाविक गोष्टी असतात. अशा अत्यंत संवेदनशील वयात आम्हाला प्रा. देशमुख सरांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.सरांनी कधीही केवळ उपदेश केला नाही तर आपल्या शिकवणीतून आणि संवादातून योग्य अयोग्याची जाणीव करून दिली. तारुण्याच्या भावविश्वाला समजून घेताना शिक्षण आणि भविष्यासाठीची जबाबदारी विसरू नये हे त्यांच्याकडून शिकायला  मिळाले.. प्रा. देशमुख सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवत होते. मात्र त्यांच्या तासिकेची व्याप्ती इंग्रजीच्या पुस्तकापूर्ती कधीच मर्यादित नव्हती... त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायला,परिस्थितीकडे चिकित्सकपणे पाहायला, स्वतःची मत तयार करायला, आणि आयुष्याकडे व्यापक दृष्टिकोनातून डोळसपणे पहायला शिकवले. सरांकडून मिळालेल्या वैचारिक प्रगल्भतेचे हे धडे आजही आमच्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने रुजवणे आणि त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचे बहुमूल्य कार्य सरांनी केले.  सरांशी जोडलेली माझ्या आयुष्यातील एक आठवण आजही मनात ताजी आहे खरं तर ते माझ्या आयुष्यातील पहिल आंदोलन असावं आणि माझ्यात नेतृत्व गुण निर्माण करण्याची पहिली संधी ! त्यावेळी आगरकर महाविद्यालय दुपारच्या सत्रात भरत असे आम्ही ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी.. जर महाविद्यालय सकाळच्या सत्रात झाले तर दुपारी आम्ही घरी किंवा शेतात जाऊन आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करू शकत होतो. मजुरी करून कुटुंबाला हातभार लावू शकत होतो. आमच्या मागणी मागे हाच साधा आणि प्रामाणिक हेतू होता. ते आंदोलन महाविद्यालयाच्या विरोधात नव्हते किंवा प्रशासनाच्या विरोधातही नव्हते ती आमच्या  परिस्थितीतून जन्मलेली मागणी होती.आणि त्यावेळी सर आमच्या पाठीशी उभे होते. आणि एक संवेदनशील शिक्षक म्हणून सरांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला. त्या मागणीचा पाठपुरावा केला आणि अखेर दुपारचे महाविद्यालय सकाळच्या सत्रात सुरू झाले. आज मागे वळून पाहताना जाणवते तो  महाविद्यालयाच्या वेळेतील केवळ फक्त बदल नव्हता तर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन आंदोलनाच्या खऱ्या उद्देशाला समजून घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांसोबत उभे राहणारा शिक्षक आम्ही त्या त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवला होता.
सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा  अधिक एक पैलू म्हणजे अध्यापनासोबतच त्यांचे साहित्य लेखन..."लोक -महर्षी" हा भारताचे पहिले कृषिमंत्री तथा विदर्भाचे सुपुत्र भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर आधारित त्यांचा पहिला काव्यसंग्रह तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता.त्याचप्रमाणे त्यांचा "प्रत्यय" हा कवितासंग्रह त्यांच्या संवेदनशील आणि चिंतनशील साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो. साहित्य प्रांतात सर सतीश देशमुख वेणीकोठेकर या नावाने महाराष्ट्रभर परिचित आहे."मुक्तछंद" हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला दिवाळी अंक असून त्या अंकाचे संपादन सुद्धा प्रा.सतीश देशमुख वेणीकोठेकर सरांनी केले आहे, "रजधूळ"सारख्या वार्षिक अंकांचे संपादन देखील सरांनी केलेले आहे. तसेच विविध दिवाळी अंकामध्ये,वृत्तपत्रांमध्ये सरांच्या कथा,कविता आणि लेख प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे सरांच्  व्यक्तिमत्व एक शिक्षक म्हणून मर्यादित राहत नाही. त्यांच्या लेखणीनेही त्यांनी समाजाशी सातत्याने संवाद साधला आहे.. विविध साहित्यिक प्रवाहांची जाण, साहित्या विषयी आस्था आणि नव्या विचारांना व्यासपीठ देण्याची त्यांची भूमिका त्यांच्या या कार्याची छाप आजही माझ्यासारख्यां ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या लेखणी मध्ये सुद्धा दिसून येते.. शिक्षण आणि साहित्या बरोबरच सामाजिक बांधिलकी ही सरांनी तितकीच जपली आहे. वृक्षारोपण आणि  व्यसनमुक्ती सारख्या सामाजिक विषयांवर सरांनी आयुष्यभर काम केले आहे .पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यापासून ते युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यापर्यंत सामाजिक प्रश्नावर त्यांनी सातत्याने काम केले शिक्षक म्हणून ज्ञान देणे, साहित्यिक म्हणून विचार मांडणे आणि सामाजिक कार्य  करून समाजासाठी प्रत्यक्ष काम करणे सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू त्यांच्या व्यापक कार्याची ओळख करून देतात... खरंतर प्रा. सतीश देशमुख वेणीकोठेकर सरांचा सहवास आम्हाला अकरावी-बारावी पुरताच लाभला. अकरावी बारावी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात गेलो, शहर बदलली,शिक्षणाच्या वाटा बदलल्या, जीवनाची धावपळ वाढली पण सरांशी जोडलेली नाळ मात्र कधीच तुटली नाही. सर नेहमी संपर्कात राहिले भेट झाली की अत्यंत आपुलकीने विचारपूस करायचे आमच्या शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसाय बद्दल आणि आमच्या आयुष्याच्या वाटचालीबद्दल जाणून घ्यायचे, गरज भासली की मार्गदर्शन करायचे, पुढे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर सर जी. त्याच संस्थेचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. शिक्षकापासून  प्राचार्य पदापर्यंतच्या त्यांचा प्रवास त्यांच्या कर्तृत्वाची आणि शैक्षणिक बांधिलकीचे साक्ष देणारा आणि आम्हाला प्रेरणादाई आहे.देशमुख सर सारखे शिक्षक हे फक्त सेवेतून निवृत्त होऊ शकतात पण विद्यार्थ्यांच्या मनातून कधीच निवृत्त होऊ शकत नाही. हे वाक्य सरांच्या बाबतीत अक्षरशा खरे ठरते. आजही सर संपर्कात आहेत. आजही त्याच आपुलकीने बोलतात आणि भेट झाली की आतुरतेने  विचारपूस करतात. म्हणजे काळ बदलला,पद बदलले,सेवेतून निवृत्ती झाली,पण गुरु-शिष्य नात्याची ती नाळ आजही तितकीच घट्ट आहे. निवृत्तीनंतर सरांनी "उत्तरायण" नावाने एक सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा प्रकल्प सुरू केला आहे. प्रा.सतीश देशमुख वेणीकोठेकर सरांच्या आयुष्याकडे पाहताना "उत्तरायण" हा शब्द अधिक अर्थपूर्ण वाटतो. एका शिक्षकाने असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश दिला, साहित्याच्या माध्यमातून विचारांची ज्योत तेवत ठेवली, सामाजिक कार्यातून समाजाशी आपले नाते जपले आणि आज निवृत्तीनंतर वयाच्या साठीनंतर सुध्दा विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक समाजसेवी म्हणून वाटचाल सुरूच आहे. सर खऱ्या अर्थाने आगरकरांचे वारस आहे असे म्हणायला हरकत नाही.सरांच्या आयुष्यातील हे उत्तरायण अधिकाधिक सुंदर,आनंदी आणि समाधानाने भरलेल असावे. ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रा. सतीश देशमुख वेणीकोठेकर सरांनी कधीकाळी मोठी स्वप्न निर्माण केली त्या विद्यार्थ्यांच्या यशात सरांना आपल्या कार्याचे समाधान मिळावे. सरांनी इतरांसाठी जी स्वप्न पाहिली त्याहूनही मोठे आणि सुंदर जग सराना स्वतःच्या आयुष्यात अनुभवायला मिळो..सरांच्या लेखणीला नवी उमेद मिळो.. सामाजिक कार्यात नवी दिशा मिळो.. आणि सरांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस ज्ञान,साहित्य, प्रेम,समाधान आणि आनंदाने उजळत राहो. ज्या विद्यार्थ्यांना सरांनी आयुष्यात ज्ञानरूपी प्रकाश दिलात आणि  आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य सार्थकी लावले आता   सरांच्या उत्तरायणातील प्रत्येक दिवस त्याच प्रकाशात अधिक सुंदर व्हावा हीच मनापासून शुभेच्छा...! आमच्या मनातील सर हे आदराचे स्थान देशमुख सरांसाठी नेहमी अढळ राहील... एकसष्ठी निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा ... त्यांनी  दिलेले ज्ञान,वैचारिक प्रगल्भता, संस्कार, आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी हीच आमच्या आयुष्याची खरी शिदोरी आहे.....!
डॉ. संघरक्षित गोपनारायण, अकोला.

    Post Views:  11


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व