विद्यापीठाच्या ध्वजातील निळा रंग हटविला!; सिद्धार्थ तलवारे यांचे १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:15 AM
   

नांदेड :  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजातून निळा रंग हटविल्याच्या जातीयवादी प्रकारा-विरोधात मागील दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने लढा देणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांनी, विद्यापीठ ध्वजातील निळा रंग पूर्ववत करावा या मागणीसाठी येत्या दि.१५ सप्टेंबरपासून विद्यापीठासमोर आपल्या सहकाऱ्यांसमवेत बेमुदत आमरण उपोषण व भजन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजात एकूण चार रंग होते. त्यामध्ये चार पट्ट्यांतील दुसरा पट्टा हा निळ्या रंगाचा होता. विद्यापीठाच्या ध्वजात निळ्या रंगाचा समावेश का करण्यात आला याचे विश्लेषण विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा येथील विचारवंत दिवंगत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी त्यांच्या 'चिंतन कुलगुरूचे' या पुस्तकात केले आहे. निळा रंग हा विशालतेचे व भव्यतेचे  प्रतीक आहे, असे या पुस्तकात नमूद करीत असतानाच शीख धर्मीय व दलित समाजाची निळ्या रंगावरील असलेली श्रद्धा डॉ.वाघमारे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे.
विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन हा ध्वज विविध रंगांचा बनविला होता.तो ठरावच आज विद्यापीठ प्रशासनाकडे सापडतच नाही,हा एक आणखीनच आश्चर्यकारक प्रकार आहे.
विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू/कुलसचिव यांनी व्यवस्थापन परिषदेचा ठराव न घेता, विद्यापीठाच्या कुठल्याही अधिनियमांत महामहीम राज्यपाल तथा कुलपती यांची परवानगी न घेता विद्यापीठाच्या ध्वजातील निळा रंग हटविला. या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे गेल्या दोन-अडीज वर्षांपासून आवाज उठवत आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत आहेत. विद्यापीठाने ध्वज बदलाबाबत दि.१०-९-२०२५ रोजी चार सदस्यीय समिती स्थापन केली.परंतु वर्ष संपत आले तरी देखील समितीचा अहवाल आढावा घेतला नाही किंवा निर्णय झाला नाही.
ध्वजातील निळा रंग हटविणे ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. विद्यापीठ प्रशासन हे जातीयवादी मानसिकतेतुन आपली मनमानी करू पाहत आहे. याच्या निषेधार्थ व ध्वजातील निळा रंग पूर्ववत करावा या मागणीसाठी सिद्धार्थ तलवारे हे येत्या १५ सप्टेंबरपासून विद्यापीठासमोर आपल्या सहकाऱ्यांसमवेत बेमुदत आमरण उपोषण व भजन आंदोलन करणार आहेत.
निळ्या रंगावर श्रद्धा असणाऱ्या विद्यार्थी व सुजाण नागरिकांनी या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन सिद्धार्थ तलवारे यांनी केले आहे.

    Post Views:  8


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व